देशव्यापी फीट इंडिया फ्रीडम रन 2.0 कार्यक्रमाचा शुभारंभ 13 ऑगस्ट रोजी

प्रत्येकाने या देशव्यापी फीट इंडिया फ्रीडम रन 2.0 मध्ये भाग घेऊन याला जनआंदोलन बनवावे: अनुराग ठाकूर

  • आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचा भाग म्हणून फीट इंडिया फ्रीडम रन उपक्रम आयोजित
  • 75 जिल्ह्यांमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यातील 75 गावांमध्ये 2 ऑक्टोबर 2021 पर्यंत साप्ताहिक कार्यक्रमांचे  आयोजन
  • 744 जिल्हे, त्या जिल्ह्यांमधील प्रत्येकी 75 गावे आणि देशभरातील 30000 शैक्षणिक संस्थांमधून फीट इंडिया फ्रीडम रन चे आयोजन केले जाईल.
  • या उपक्रमातून 7.50 कोटी युवक आणि नागरिक या फ्रीडम दौडमध्ये भाग घेण्यासाठी येतील.

नवी दिल्ली ,१०ऑगस्ट /प्रतिनिधी :- आजादी का अमृतमहोत्सव – इंडिया@75 या कार्यक्रमांतर्गत केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाने देशभरात  फीट इंडिया फ्रीडम रन 2.0 चे आयोजन केले आहे. आजादी का अमृतमहोत्सव या उपक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणापासून प्रेरणा घेत, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आजादी का अमृतमहोत्सवसाठी  कृती आणि संकल्प @75  या कल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

देशव्यापी फीट इंडिया फ्रीडम रन  2.0 कार्यक्रमाचा  शुभारंभ केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर  13 ऑगस्ट  2021 रोजी  करतील अशी माहिती माध्यमकर्मींशी संवाद साधताना केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा सचिव उषा शर्मा यांनी आज दिली. उद्‌घाटनाच्या सोहळ्याला  केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक उपस्थित राहतील. याशिवाय BSF,CISF, CRPF, Railways, NYKS, ITBP, NSG, SSB या संस्थांही देशभरातील महत्वाच्या स्थानांवरुन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून   उपस्थित राहतील. याशिवाय उद्‌घाटनाच्या दिवशी म्हणजे 13 ऑगस्ट 2021 रोजी विविध 75 ऐतिहासिक स्थळांवर बहुविध कार्यक्रम  होतील.

याशिवाय 75 जिल्ह्यांमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यातील 75 गावांमध्ये 2 ऑक्टोबर 2021 पर्यंत साप्ताहिक कार्यक्रम आयोजित केले जातील. फीट इंडिया फ्रीडम रन चे आयोजन 744 जिल्हे, त्या जिल्ह्यांमधील प्रत्येकी 75 गावे आणि देशभरातील 30,000 शैक्षणिक संस्थांमधून केले जाईल. या उपक्रमातून 7.50 कोटी युवक आणि नागरिक या फ्रीडम दौडमध्ये भाग घेण्यासाठी येतील.

आपण स्वातंत्र्याचं 75 वर्ष साजरं करत आहोत. तंदुरुस्त आणि निरोगी भारतासाठी आपण संकल्प केला पाहिजे कारण केवळ तंदुरुस्त आणि निरोगी भारतच एक मजबूत भारत बनू शकतो. म्हणून, मी सर्वांना आग्रह करतो,  देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन २.० मध्ये भाग घ्या आणि त्याला लोकचळवळ बनवा,  असे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

यंदा फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 13 ऑगस्ट 2021 रोजी सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर 2021 रोजी तिची सांगता होईल. लोकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात धावणे आणि खेळ यासारख्या तंदरुस्ती राखणाऱ्या फिटनेस उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, तसेच लठ्ठपणा, आळशीपणा, तणाव, चिंता, आजार यापासून मुक्तता मिळवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.  यातील “फिटनेस की डोस आधा घंटा रोज” मोहिमेद्वारे, नागरिकांनी रोज किमान 30 मिनिटे शारीरिक व्यायाम करण्याचा संकल्प करण्यासाठी आवाहन केले जात आहे .

फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 च्या प्रमुख उपक्रमांमध्ये प्रतिज्ञा, राष्ट्रगीत सादर करणे, फ्रिडम रन, कार्यक्रमस्थळी सांस्कृतिक कार्यक्रम, सहभागासाठी युवा स्वयंसेवकांमध्ये जागरूकता आणि त्यांच्या गावांमध्ये अशाच फ्रीडम रनचे आयोजन करणे समाविष्ट आहे.  लोक फिट इंडिया पोर्टल https://fitindia.gov.in वर नोंदणी करू शकतात आणि आपला धावण्याचा उपक्रम अपलोड करू शकतात. तसेच या उपक्रमाचा आपल्या सोशल मिडिया हँडलवरुन #Run4India आणि #AzadikaAmritMahotsav या शीर्षकाखाली प्रचारही करु शकतात.

समाजातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, पंचायत राज  नेते, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, प्रसारमाध्यमे, डॉक्टर, शेतकरी आणि लष्कराच्या जवानांना विनंती आहे त्यांनी विविध स्तरांवर या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, कार्यक्रमात सहभागी व्हावे,  लोकांना प्रोत्साहित करावे, प्रेरित करावे.  कोविड-19 नियमांचे काटेकोर पालन करुन देशभरात प्रत्यक्ष आणि आभासी माध्यमातून उपक्रमाचे आयोजन केले जाईल.

केंद्र सरकारची मंत्रालये, राज्य सरकारे आणि इतर संस्थांनी 2 ऑक्टोबर 2021 पर्यंत  प्रत्यक्ष/आभासी माध्यमातून फ्रिडम रन कार्यक्रम आयोजित करावा अशी विनंती करण्यात आली आहे. हा उपक्रम लोकचळवळ व्हावी यासाठी, मित्र, कुटुंब आणि समवयस्क गट इत्यादींना जास्तीत जास्त संख्येने यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

कोविड-19च्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी फिट इंडिया फ्रीडम रन’ ची संकल्पना मांडण्यात आली.  महामारीच्या काळात सुरक्षित अंतर हीच ‘नवी सामान्य जीवनशैली बनली होती. अशावेळी सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करत असतानाही अत्यावश्यक गरज असलेला फिटनेस कायम राखण्यासाठी  फिट इंडिया फ्रीडम रन संकल्पना पुढे आली. तेव्हा ती व्हर्च्युअल म्हणजे आभासी संकल्पनेवर आधारीत होती. उदा. ‘ कुठेही आणि कधीही धावता येते!  आपण धावण्यासाठी आवडीचा मार्ग निवडा , आपल्याला अनुकूल अशा वेळी धावा.   अर्थात, शर्यतही तुमचीच आणि वेगही तुमचाच.  

उपक्रमाच्या पहिला भागा अंतर्गत 15 ऑगस्ट 2020 ते 2 ऑक्टोबर 2020 यादरम्यान फ्रिडम रन झाली. या फ्रिडम रन मधे केंद्रीय सशस्त्र सेना, स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था, शाळा, व्यक्ती, युवक संस्था, केन्द्र आणि राज्यांचे विभाग यासह 5 कोटीहून अधिक लोकांनी भाग घेतला. अंतर्गत सुमारे 18 कोटी किलोमीटरचे अंतर कापण्यात आले.