गुजरातचा राजस्थानवर 7 विकेट्सने विजय, विजेतेपदावर कोरलं नाव

अहमदाबाद : गुजरात टायटन्सने आपल्या पदार्पणातील मोसमात धमाका केलाय. राजस्थान रॉयल्सवर 7 विकेट्सने विजय मिळवत गुजरातने आयपीएल विजेतेपद  पटकावलंय. राजस्थानने गुजरातला विजयासाठी 131 धावांचे आव्हान दिले होते. गुजरातने हे विजयी आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात आणि 11 बॉलआधी पूर्ण केलं. आयपीएललला 5110 दिवसांनंतर पहिलीच आयपीएल खेळून जिंकणारी गुजरात पहिलीच टीम ठरली आहे. याआधी 1 जून 2008 साली आयपीएलच्या पहिल्या मोसमात राजस्थान रॉयल्सचा विजय झाला होता.

राजस्थानने दिलेलं 131 रनचं आव्हान गुजरातने 18.1 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पार केलं. शुभमन गिलने 43 बॉलमध्ये नाबाद 45 रन केल्या, तर हार्दिक पांड्या 30 बॉलमध्ये 34 रन करून आऊट झाला. डेव्हिड मिलरने 19 बॉलमध्ये नाबाद 32 रन केले. राजस्थानकडून बोल्ट, कृष्णा आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांना 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 130 रनच करता आले. हार्दिक पांड्याने 4 ओव्हरमध्ये 17 रन देऊन 3 विकेट घेतल्या. याशिवाय साई किशोरला 2 विकेट मिळाल्या, तर मोहम्मद शमी, यश दयाळ आणि राशिद खान यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. राजस्थानकडून बटलरने सर्वाधिक 39 तर यशस्वी जयस्वालने 22 रन केले, या दोघांशिवाय राजस्थानच्या कोणत्याच खेळाडूला मोठा स्कोअर करता आला नाही.