गरज पडल्यास जमीन विकत घेऊ, पण क्रीडा विद्यापीठ करू: अतुल सावे

– जिल्हा ऑलिम्पिक संघटनेकडून ४५३ खेळाडू, मार्गदर्शकांचा सत्कार
– ऑलिम्पियन दत्तू भोकनळ यांच्या हस्ते गौरव

औरंगाबाद,२८ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-क्रीडा विद्यापीठ ही मराठवाडा भागाची गरज आहे. त्यामुळे सरकारी जमीन मिळाली तर ठीक अन्यथा जमीन विकत घेऊ पण क्रीडा विद्यापीठ औरंगाबाद मध्ये करू अशी घोषणा राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी रविवारी केली. औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने ४५३ खेळाडू, क्रीडा शिक्षक, मार्गदर्शकांचा गौरव सावे आणि ऑलिम्पियन दत्तू भोकनळ यांच्या हस्ते करण्यात आला.

मेजर ध्यानचंद यांची जयंती तथा राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडू, क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक यांचा गौरव करण्यात आला. संत एकनाथ रंग मंदिरात रविवारी पार पडलेल्या खेळाडूंच्या या सत्कार सोहळ्याला राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, ऑलिम्पियन तथा अर्जुन पुरस्कारार्थी दत्तू भोकनळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

खो-खो खेळाच्या उद्धारासाठी तब्बल पन्नास वर्षे अविरत कार्य करणारे रमेश भंडारी यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, डॉ.उदय डोंगरे, डॉ.मकरंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

क्रीडा विद्यापीठ ही औरंगाबाद तथा मराठवाड्याची गरज असताना हे विद्यापीठ अजून आपल्या भागाला मिळाले नाही. त्यामुळे सरकारी जमीन घेऊन हे विद्यापीठ करू. सरकारी जागा न मिळाल्यास जमीन विकत घेऊ पण हे विद्यापीठ करू अशी अशी घोषणा राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी आज या कार्यक्रमात केली. बालेवाडीच्या धर्तीवर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ विभागाला ही सुविधा मिळालीच पाहिजे. या क्रीडा विद्यापीठाचे लवकरच भूमिपूजन केले जाईल, असे ते पुढे म्हणाले.

दत्तू भोकनळ यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, अनेकदा आपण मेहनातीकडे पूर्ण लक्ष देत नाही. मात्र आपल्या भोवती असलेल्या सुविधांकडे जास्त पाहतो. असे न करता आपल्या मेहनतीकडे अधिक लक्ष दिले तर खेळाडूला त्याचा फायदाच होतो.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त औरंगाबाद ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने गौरविण्यात आलेल्या जिल्ह्यातील आंतराष्ट्रीय खेळाडूं व आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारार्थीं सोबत सहकारमंत्री अतुल सावे, ऑलिंपियन दत्तू भोकनळ, रमेश भंडारी, पंकज भारसाखळे, डॉ.उदय डोंगरे, डॉ.मकरंद जोशी, पोलीस निरीक्षक सुरेश गिरमे,  जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेकर घुगे, अब्दुल कादिर आदी.

डॉ. निलेश गाडेकर (सोयगाव), निलेश गायकवाड (पैठण), बाबासाहेब माने (सिल्लोड), विजय बारवाल (कन्नड), भाऊसाहेब खरात (वैजापूर), नामदेव पवार (फुलंब्री), कैलास वाहूळे (औरंगाबाद), राजेंद्र गंगावणे (खुलताबाद), निलेश माने (गंगापूर) यांना आदर्श  क्रीडा शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू : अदिती निलंगेकर (पॅरा ऑलिम्पिक), सृष्टी साठे (सुवर्ण पदक, आशियाई कनिष्ठ बॉक्सिंग), शर्वरी कल्याणकर (सुवर्ण पदक, आशियाई कनिष्ठ बॉक्सिंग), तनिशा बोरामणीकर (रौप्य पदक, आशियाई बुद्धिबळ), गौरव म्हस्के (कांस्य पदक, आशियाई ज्युनियर बॉक्सिंग), कशीष भराड (आशियाई तलवारबाजी), वैदेही लोया (आशियाई तलवारबाजी), साक्षी चितलांगे (रौप्य पदक, आशियाई बुद्धिबळ), तेजस शिरसे (आशियाई अथलेटिक्स स्पर्धा), रिद्धी हत्तेकर, सिद्धी हत्तेकर (आशियाई जिम्नॅस्टिक स्पर्धा), अभय शिंदे (आशियाई तलवारबाजी), श्रेयस जाधव (आशियाई तलवारबाजी), आयर्नमॅन संदीप गुरमे (युरोपिअन चॅम्पिअनशिप ) यांच्यासह विविध खेळांतील ४५३ राष्ट्रीय खेळाडू, ५७ क्रीडा मार्गदर्शकांचा देखील मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.दिनेश वंजारे, विश्वास जोशी, डॉ.अब्दुल कादिर, डॉ.दयानंद कांबळे, डॉ.संदीप जगताप, अमृत बिऱ्हाडे आदींनी परिश्रम घेतले.