‘स्वारातीम’ विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ ऑनलाईन असल्यामुळे विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक नाही- डॉ. वसंत भोसले

नांदेड ,३ मे /प्रतिनिधी 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा तेविसावा दीक्षान्त समारंभ मंगळवार, दि.४ मे रोजी सकाळी ११.०० वाजता दूरदृष्य प्रणाली (ऑनलाईन) द्वारे पार पडणार आहे. या समारंभामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पदवी प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार नाही. हा  दीक्षान्त समारंभ ऑनलाईन असल्यामुळे आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक नाही, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. वसंत भोसले यांनी कळविले आहे.

दि.०४ मे रोजी पार पडणाऱ्या या दीक्षान्त समारंभाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलपती श्री भगत सिंह कोश्यारी हे भूषविणार आहेत. यावेळी मुख्य अतिथी म्हणून राज्यचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि मुंबई येथील टाटा इंस्टीट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटरचे संचालक प्रा. डॉ. एस.रामकृष्णन हे उपस्थित राहणार आहेत. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या उपस्थितीत हा ऑनलाईन  दीक्षान्त समारंभ संपन्न होणार आहे.

या तेविसाव्या  दीक्षान्त  समारंभासाठी ज्या विद्यार्थ्यांनी पदवी आवेदन पत्र सादर केलेले आहे, त्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र त्यांच्या महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पदवी वितरण कार्यक्रमामध्ये पदवी प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे. पीएच.डी. विद्यार्थी, विद्यापीठ परिसर, उप-परिसर, न्यु मॉडेल डिग्री कोलेजच्या ज्या-ज्या विद्यार्थ्यांनी पदवी मिळण्यासाठी अर्ज केले आहेत, त्यांना दि.१५ मे किंवा लॉकडाऊन नंतर प्रत्यक्ष पदवी देण्यात येईल. याशिवाय विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

या  दीक्षान्त  समारंभाचे विद्यापीठाच्या (www. srtmun.ac.in) संकेतस्थळावर थेट प्रसारण करण्यात येणार असून विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, संचालक, अधिकारी कर्मचारी यांच्यासह पालकांनी घरी बसून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. वसंत भोसले यांनी केले आहे.