बंगालमध्ये ममतांची सरशी,तामिळनाडूमध्ये सत्तांतर ,केरळमध्ये एलडीएफला लागोपाठ दुसऱ्यांदा यश,आसाममध्ये भाजपाची सत्ता कायम 

नवी दिल्ली :सर्वांचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी आपली सत्ता कायम राखल्याचे स्पष्ट झाले. ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅटट्रिक साधल्याचं चित्र स्पष्ट आहे. पण त्या स्वतः हरल्या . संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तृणमूल काँग्रेसने २०० हून अधिक जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर दुसरीकडे कडवं आव्हान देत जोरदार प्रचार केलेल्या भाजपाच्या हाती मोठी निराशा आली आहे. ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असून पश्चिम बंगालमधील जनता पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत.
ममता बॅनर्जी यांनी हा लोकांचा विजय असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान नंदीग्राममध्ये सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींवरुन त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग सूडाने वागत असल्याची टीका त्यांनी इंडिया टु़डेशी बोलताना केली आहे. निवडणूक आयोगाकडून आपल्याला त्रास दिला जात असून पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली असल्याचं सांगितलं आहे. 

 राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही ममता बॅनर्जींचं अभिनंदन केलं आहे.

“ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्याच्या हिंमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय या वाघिणीलाच द्यावे लागेल,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. “पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारं ममतादीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममतादीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाल जनतेचे मनापासून अभिनंदन करतो,” असंही  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी  म्हटलं आहे.

दुसरीकडे तामिळनाडूमध्ये सत्तांतराची लाट बघायला मिळाली आहे. तामिळनाडूतील मतदारांनी द्रमुकच्या हाती सत्ता सोपवल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. द्रमुक १३३ जागी आघाडीवर आहे. तामिळनाडूत बहुमताचा आकडा ११८ इतका आहे.  केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन नवा इतिहास नोंदवला आहे. विजयन यांना सलग दुसऱ्यांदा सत्तेची संधी मतदारांनी दिली आहे. आसाममध्ये मात्र, भाजपाने आपली सत्ता राखली आहे. सध्या भाजपाने  ५९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस २९ जागांवर आघाडीवर आहे.