बारावीच्या निकालाचा टक्का घसरला ;राज्यात ९१.२५ टक्के निकाल 

मुंबई, २५ मे  / प्रतिनिधी :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. राज्यात एकूण 91.25 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत २.९७ टक्क्यांनी घटला. निकाल घटण्याबरोबरच राज्यातील गुणवंतही घटले आहेत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी २ हजार ३५१ ने कमी झाले आहेत.

गेल्या वर्षीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्धा तास अतिरिक्त, कमी केलेला अभ्यासक्रम अशा सवलती देण्यात आल्या होत्या. त्यामुळे २०२१च्या तुलनेत गेल्या वर्षी २०२२मध्ये निकाल घटला. यंदा शंभर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा, गैरप्रकार रोखण्यासाठी काटेकोर नियोजन आदी उपाययोजना करण्यात आल्या. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या निकालात २.९७ टक्क्यांनी घट झाली.

बारावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 14 लाख 28 हजार 194 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची ही टक्केवारी 91.25 अशी आहे. तर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 44.33 अशी आहे. नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 6113 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6072 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यातील 5673 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 93.43 इतकी आहे, अशी माहिती शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.

उत्तीर्ण होण्यामध्ये मुलींची आघाडी

सर्व विभागीय मंडळातून नियमित उत्तीर्ण मुलींचा निकाल ९३.७३ टक्के असून मुलांचा निकाल 89.14 टक्के आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 4.59 टक्क्यांनी जास्त आहे.

शाखानिहाय निकाल

इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 96.09, कला शाखेतील विद्यार्थ्यांची टक्केवारी 84.05, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांची टक्केवारी 90.42 तर व्यवसाय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 89.25 इतकी आहे. तर एकूण 154 विषयांपैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के आहे.

विभागीय मंडळनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी

राज्यातील सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच 96.01 टक्के इतका असून मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.13 टक्के इतका आहे. या व्यतिरिक्त पुणे विभागात 93.34, नागपूर विभागात 90.35, औरंगाबाद विभागात ९१.८५, कोल्हापूर विभागात ९३.२८, अमरावती विभागात 92.75, नाशिक विभागात ९१.६६ आणि लातूर विभागात 90.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळामार्फत देण्यात आली आहे.

पुढील वर्षीही प्रचलित पद्धतीनेच परीक्षा

पुणे : नव्या शैक्षणिक धोरणानुसार, दहावी-बारावीच्या परीक्षा होणार नसल्याचा गैरसमज समाजमाध्यमातून पसरला आहे. याबाबत राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी गुरुवारी स्पष्टीकरण देत पुढील वर्षीही दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनेच होणार असल्याचे सांगितले.

शाखानिहाय निकाल

कला – ८४.०५ टक्के

विज्ञान – ९६.९ टक्के

वाणिज्य – ९०.४२ टक्के

व्यवसाय अभ्यासक्रम – ९१.२५ टक्के   आयटीआय – ९०.८४ टक्के

विभागीय मंडळनिहाय निकाल

कोकण – ९६.१ टक्के

पुणे : ९३.३४ टक्के 

नागपूर – ९०.३५ टक्के

औरंगाबाद – ९१.८५ टक्के

मुंबई – ८८.१३ टक्के 

कोल्हापूर – ९३.२८ टक्के

अमरावती – ९२.७५ टक्के 

नाशिक – ९१.६६ टक्के

लातूर – ९०.३७ टक्के 

गेल्या पाच वर्षांचा निकाल 

२०१८ – ८८.४१ टक्के 

२०१९ – ८५.८८ टक्के 

२०२० – ९०.६६ टक्के 

२०२१ – ९९.६३ टक्के 

२०२२ – ९४.२२ टक्के

उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता पुरवणी परीक्षेत यश संपादन करावे – दीपक केसरकर

परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता पुरवणी परीक्षेस प्रविष्ट होऊन यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

यशातून मिळेल नव्या संधींना गवसणी घालण्याचे बळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘बारावीच्या परीक्षेनंतर करिअरची दिशा निश्चित होते. त्यामुळे या परीक्षेसाठी मेहनत घेतली जाते. बारावी परीक्षेतील यशासाठी उत्तीर्ण सर्व गुणवंत- यशवंताचे अभिनंदन, त्यांना भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारावी उत्तीर्णांचे अभिनंदन केले आहे. या परीक्षेत यंदा मुलींनी, दिव्यांगांनी लक्षणीय यश मिळवले आहे, त्यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘आयुष्यात येणारे महत्त्वाचे टप्पे-आव्हाने म्हणजे एक परीक्षाच असते. या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी अशा परीक्षा करवून घेत असतात. त्यामुळे सातत्यपूर्ण मेहनत आणि प्रयत्न महत्त्वाचे ठरतात. कित्येकजण कठोर मेहनत घेतात, त्यातून मिळालेले यश नव्या संधींना गवसणी घालण्याचे बळ देते. बारावीच्या परीक्षेत असे यश मिळविणाऱ्यांचे आणि त्यासाठी त्यांना पाठबळ देणाऱ्या कुटुंबियांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा’.

‘परीक्षा एक टप्पा आहे. त्यामुळे यात यश न मिळालेल्यांनी खचून न जाता, नव्या उमेदीने प्रयत्न करावेत. यश तुमचेच असेल’, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.