कोविड सेंटर मध्ये अहोरात्र सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते तिन्ही रुग्णवाहिकेचे लोकार्पण

खासदार इम्तियाज जलील यांच्या वतीने औरंगाबाद शहरासाठी रुग्णवाहिकेची मोफत सेवा

औरंगाबाद​,३ मे /​प्रतिनिधी  : 

औरंगाबाद शहरात कोरोनाग्रस्त व इतर आजाराने त्रस्त गोरगरीब रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचता यावे म्हणुन खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहरा​साठी ​ स्वखर्चाने तीन नविन रुग्णवाहिकेची मोफत व्यवस्था केली आहे.

औरंगाबाद शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात सामान्य रुग्णालय, औषधीशास्त्र आणि अतिदक्षता विभागात अहोरात्र सेवा देणाऱ्या प्रभाकर शेवलेकर, माधवी गोजेगावे, अफसर बानो नसिम बानो, जिजा राठोड, मोहम्मद सलिम अब्दुल रसुल, राहुल आठवले, आशेय केदारी या चतुर्थश्रेणी कर्मचारी नर्स, वॉर्डबॉय, सेक्युरिटी गार्ड यांच्या हस्ते आज दिनांक ३ मे रोजी उद्घाटन करण्यात आले.          औरंगाबाद शहरात कोविडचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजनांची ​अं​मलबजावणी करण्यात येत आहे. त्यालाच मदतीचा एक हा​त ​ म्हणुन खासदार इम्तियाज जलील यांनी गोरगरीब रुग्णां​साठी ​ सदरील तिन्ही रुग्णवाहिका पुर्णपणे मोफत उपलब्ध करुन दिले आहे. तिन्ही रुग्णवाहिका हे औरंगाबाद शहरातील रुग्णांना मोफत सेवा देणार असुन विशेष म्हणजे तिन्ही रुग्णवाहिकेत गंभीर आजारी रुग्णा​साठी ​ ऑक्सीजनची सुध्दा मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. गोरगरीब रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णवाहिकेची सेवा घेताना कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नसल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी ​जाहीर ​ केले आहे. 

       

या रुग्णवाहिकेचा लोकर्पण सोहळा याच कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यामागे खासदार इम्तियाज जलील यांचा अत्यंत भावनिक दृष्टीकोन होता तो हा की रुग्णांची सेवा करताना आई, वडिल किंवा मुलाची भुमिका घेवुन जे कर्मचारी पडद्यामागे प्रत्यक्ष सेवा करत आहेत तेच खऱ्या अर्थाने कोविड योध्दा आहे​त ​.     

   

लोकर्पण सोहळ्यामागची भुमिका स्पष्ट करताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, कोविडग्रस्त झालेल्या रुग्णांची सेवा बजावतांना पिपिई किट जी की सामान्य व्यक्ती पाच ते दहा मिनिटाच्यावर परिधान करु शकत नाही. तीच पिपिई किट हे कर्मचारी २४ तास वापरुन रुग्णसेवा करतात. रुग्णांना जेवण देणे, पाणी देणे, औषधी देणे व त्यांना हव्या नको असलेल्या सर्व बाबींवर बारकाईने लक्ष केंद्रित करुन रुग्ण बरा करण्याच्या हेतुने अखंड कार्यरत राहणारे कर्मचारीच या महत्वपुर्ण लोकार्पण सोहळ्याचे मानकरी ठरु शकतात. म्हणुनच त्यांच्याच हस्ते आजचा हा लोकार्पण सोहळा संपन्न झाल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
खासदार जलील नेहमी गोरगरीबांसाठी मदत करण्यात अग्रेसर  – अधिष्ठाता डॉ. कानन ​येळीकर ​

रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. कानन येडीकर यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, खासदार इम्तियाज जलील हे नेहमी गोरगरीबांसाठी वैद्यकीय मदत मिळावी व त्यांना दर्जेदार उपचार मिळावा याकरिता अग्रेसर असतात. रुग्णवाहिकेची सेवा पुर्णपणे मोफत असल्याने शहरातील गोरगरीब जनतेला याचा फायदा होणार आहे. सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉ.कानन येडीकर यांनी खासदार इम्तियाज जलील यांचे कौतुक करुन आभार मानले.   रुग्णालयाच्या इतिहासात पहिल्यांदा मिळाला एवढा ​सन्मान ​खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्यामुळे आज ३५ वर्षात पहिल्यांदाच पडद्यामागे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना एवढा सम्मान मिळाल्याचे उद्घाटन करणारे नर्स, ​वॉर्ड ​बॉय व सुरक्षा रक्षकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले कि  आजपर्यंत घाटी परिसरात हजारो कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमात मोठ्या लोकांना माहिती देणे, सोयी सुविधा देणे आणि सुरक्षा पुरविण्यातच  एवढी वर्ष खर्च झाली. परंतु पहिल्यांदाच आज आम्हाला ​प्रमुख पाहुणे ​ म्हणुन बोलविण्यात आले आणि आमच्या ​हस्ते ​ रुग्णवाहिकांचे ​उदघाटन ​ करण्यात आल्याने उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी खासदार इम्तियाज जलील यांचे आभार मानले.​

अनुभव कथन ​
लोकार्पण सोहळ्याच्या दरम्यान चतुर्थ कर्मचारी नर्स, वार्डबॉय व सुरक्षा रक्षकांनी खासदार इम्तियाज जलील यांना सांगितले की, जेव्हा एखादा रुग्ण ​पू​र्णपणे बरा होतो. तेव्हा त्याला निरोप देताना जे आनंदाश्रु निघतात ते हे दर्शवितात की, याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांची सेवा करताना खऱ्या अर्थाने आई-वडिलांची भुमिका घेवुन रुग्ण सेवा केल्यामुळेच आम्ही बरे होवुन आमच्या घरी चाललो ही उत्कट भावना जेव्हा त्यांचा मनात निर्माण होते तेव्हा त्या सर्व भावना ​अ​श्रुरुपाने प्रकट होतात. असे अनेक प्रसंग निर्माण झाल्याचे या कर्मचाऱ्यांनी खासदार इम्तियाज जलील यांना सांगितले. व ते म्हणाले की, आता या रुग्णवाहिकेमुळे आमच्या या कार्यास अधिक बळकटी मिळुन रुग्ण वाचण्याचे टक्केवारी हमखास वाढणार  असुन गोरगरीबांना या संकटकाळी मोठी मदत होणार आहे.
          या लोकार्पण सोहळ्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. वर्षा का​गि​नाळकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. ​सुधीर ​ चौधरी, डॉ. कैलास झिने व डॉ. सुरेश हरबडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.