आरोग्य क्षेत्रासाठी 2 लाख कोटी रुपयांची तरतूद -केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

बालरोग शल्यचिकित्सकांच्या आभासी वार्षिक परिषदेच्या उद्‌घाटन समारंभाला केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ भागवत किसनराव कराड यांची उपस्थिती

नवी दिल्ली,२३ऑक्टोबर /प्रतिनिधी :-भारतीय बालरोग शल्यचिकित्सक संस्थेच्या  47 व्या वार्षिक परिषदेचे उद्‌घाटन केंद्रीय वित्त राज्यमंत्री आणि या परिषदेचे प्रमुख पाहुणे डॉ. भागवत कराड यांनी आज नवी दिल्ली येथून आभासी मंचाच्या माध्यमातून केले.

केईएम रुग्णालयाचे  माजी विद्यार्थी आणि राज्यसभेचे सदस्य होण्यापूर्वी औरंगाबाद येथे वैद्यकीय सेवा देणारे बालरोगतज्ञ,डॉ. भागवत कराड यांनी या समारंभात  माहिती दिली की,  वार्षिक अर्थसंकल्पाच्या 35 लाख कोटी रुपयांपैकी सुमारे 2 लाख कोटी रुपयांची तरतूद  आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात येते.  बालरोग शल्यचिकित्सक जगताला शक्य त्या सर्व मार्गांनी मदत करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे, डॉ. कराड यांनी उपस्थितांना सांगितले.न जन्मलेल्या बालकांसाठी  आणि नवजात बालकांना विमा कवच देण्याच्या दृष्टीने, विमा कंपन्या आता उत्सुक असल्याचे समजताच डॉ. कराड यांनी अत्यंत आनंद व्यक्त केला. यासंदर्भातील प्रक्रिया जलद करण्यासाठी ते भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणामध्ये (आयआरडीएआय)  जास्तीत जास्त प्रयत्न करतील असे आश्वासन डॉ कराड यांनी यावेळी दिले.

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ.स्नेहलता देशमुख या उद्घाटन समारंभाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.विशेष अतिथी स्नेहलता देशमुख यांनी कार्यक्रमात बोलताना  सांगितले की,  बालरोग शल्यचिकित्सा क्षेत्राने आता मोठी प्रगती केली आहे आणि नवीन उपकरणे तसेच  तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, जटिल बालरोग शस्त्रक्रियांचे  परिणाम पूर्वीच्या तुलनेत बरेच चांगले आहेत,  पूर्वी कधी ऐकिवात नसलेली लहान मुलांवर  कमीत कमी जखम करून केली जाणारी शस्त्रक्रिया आणि रोबोटिक शस्त्रक्रिया आता एक वास्तविकता बनली आहे आणि बहुतांश  बालके  या नवीन तंत्रांचा लाभ घेत आहेत. यामुळे नवजात बालकांचे शल्यचिकित्सेवेळी होणारे मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे.

‘बालरोग शस्त्रक्रिया- मूलभूत आणि या पलीकडे’ या संकल्पनेसह सीएमई म्हणजेच शाश्वत वैद्यकीय शिक्षण या पूर्व परिषदेने सुरु झालेला हा आठवडाभराचा वैद्यकीय कार्यक्रम 24 ऑक्टोबर 2021 रोजी संपणार असून यामध्ये सुमारे 500 वैज्ञानिकांमध्ये विचारविनिमय होईल आणि दोन औपचारिक भाषणे होतील.