स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गोवा ते कोची दरम्यान नौकानयन स्पर्धेचे आयोजन

मुंबई ,२३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून भारतीय नौदल , भारतीय नौकानयन संघटनेच्या (INSA) माध्यमातून कोची ते गोवा दरम्यान ऑफशोर नौकानयन स्पर्धा आयोजित करत आहे. म्हादेई, तारिणी, बुलबुल, नीलकंठ, कडलपुरा आणि हरियाल या सहा भारतीय नौदल नौका (INSVs) या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा 24 ऑक्टोबर 21 रोजी सुरु होणार असून पाच दिवसांच्या कालावधीसाठी असेल . कोची इथल्या नौदल तळावरून सुरुवात केल्यानंतर गोवा पर्यंतचे अंदाजे 360 सागरी मैल अंतर पार करण्यात येईल.

नौदलाच्या सहा नौकांपैकी चार नौका 40 फूट आणि दोन नौका 56 फूट ऊंचीच्या आहेत. नौदलाच्या तीन कमांडसह अंदमान आणि निकोबार कमांड (ANC ) आणि संरक्षण मंत्रालयाच्या एकात्मिक मुख्यालय (HQ MoD ) मधील नौदल कर्मचारी या नौकाचे स्पर्धे दरम्यान परिचालन करतील. याशिवाय, यॉटिंग असोसिएशन ऑफ इंडिया (YAI) शी संलग्न क्लबच्या नौका देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या मोहिमेचे आयोजन संरक्षण मंत्रालयाचे एकात्मिक मुख्यालय (HQ MoD ) आणि आयएनएस मांडवी, गोवा स्थित भारतीय नौदलाच्या ओशन सेलिंग नोड (OSN) ने केले आहे.

यातील सहभागी हे गेल्या एक महिन्यापासून या स्पर्धेसाठी सराव करत आहेत आणि त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी त्यांनी कोची येथे प्रशिक्षण अभ्यासक्रम देखील पूर्ण केला आहे.

          या स्पर्धेत सहभागी झालेल्या 56 फुट उंचीच्या दोन नौकांनी यापूर्वीच सागरी परिक्रमेत भाग घेऊन भारतीय नौदलाचा इतिहास रचला आहे. म्हादेई या नौकेवरून 2010 मध्ये कॅप्टन दिलीप दोंदे आणि 2013 मध्ये कमांडर अभिलाष टोमी यांनी स्वतंत्रपणे ‘सागर परिक्रमा’ केली होती .आय एन एस तारिणीवरून 2017 मध्ये सर्व महिला अधिकार्यांनी ‘नाविका सागर परिक्रमा’ केली.

ओएसएनकडे भारतीय नौदलाच्या महासागरात नौकानयन करणाऱ्या (ओशन सेलिंग) नौका आहेत. पुरेसा समुद्री नौकानयन अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याची स्पर्धेसाठी निवड केली जाते.