औरंगाबाद​ शहरातील प्रलंबित व प्रस्तावित विकास कामे त्वरित करण्यावर भर द्यावे – खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद​,२२ एप्रिल /प्रतिनिधी ​ : खासदार इम्तियाज जलील यानी आज औरंगाबाद महानगपालिका कार्यालयात आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यासोबत औरंगाबाद शहराच्या विकासाच्या दृष्टीने शहरातील विविध प्रलंबित व प्रस्तावित विकास कामाविषयी सविस्तर चर्चा केली. तसेच कोविड चा प्रादुर्भाव थांबविण्याच्या दृष्टीने महानगर पालिका तर्फे करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती घेतली.         

या बैठकीमध्ये खासदार इम्तियाज जलील यानी औरंगाबाद शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा समस्येविषयी चर्चा करून सर्व वार्डातील नागरिकांना वेळेवर स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याचे सूचित केले. जेणे करून संचार बंदीच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही.          

बैठकीमध्ये खासदार इम्तियाज जलील यानी प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या सोबत पुढील मुद्यावर सविस्तर चर्चा करून लवकरच काम सुरू करण्याचे सूचित केले. त्यामध्ये प्रामुख्याने सलीम अली लेक हे शहराच्या पर्यटनाच्या दृष्टीने अती महत्वाचे असल्याने त्याचे संवर्धन व सौंदर्यीकरण करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात यावे. विकास आराखड्यातील दमडी महल ते जालना रोड या शंभर फुटाच्या रस्त्याचे नवीन कामात बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांना मोबदला  यापूर्वीच मिळाला असल्याने लवकरच रस्ता तयार करण्याचे काम सुरू करण्यात यावे. शहरातील मध्यभागी असलेल्या नेहरू भवन येथे अद्यावत नवीन बांधकाम सुरू करण्यात यावे. कट कट गेट येथे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम काही कारणास्तव थांबल्याने त्याची संपूर्ण माहिती घेवून नियमाप्रमाणे ते काम लवकर सुरू करण्यात यावे जेणे करून वाहतुकीची समस्या दूर होणार. प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यानी विकासाचे कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील याना आश्र्वासित केले.         

सदरील बैठकीमध्ये याव्यतिरिक्त शहराचे विकासाच्या दृष्टीने इतर महत्त्वाच्या व स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यानी दिली.