एसटी महामंडळातील वाहक पीडित महिला कर्तव्‍यावर असताना विनयभंग: खासगी एजंटला एक वर्षे सक्तमजुरी आणि २८ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा

औरंगाबाद ,३० जून /प्रतिनिधी :-एसटी महामंडळातील वाहक पीडित महिला कर्तव्‍यावर असताना तिचा हात पकडून विनयभंग करित जीवे मारण्‍याची धमकी दिल्याप्रकरणी खासगी वाहनाचा एजंट जाकेर खान मेहबुब खान (३५, रा. भोईवाडा) याला एक वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली २८ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.जे. रामगडिया यांनी ठोठावला. विशेष म्हणजे दंडाच्‍या रक्कमेपैकी दहा हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून पीडित वाहक महिलेला देण्‍याचे आदेश देखील न्‍यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणात एसटी महामंडळात वाहन म्हणुन कार्यरत असणाऱ्या ३० वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, २४ मे २०१७ रोजी पीडिता या मध्यवर्ती बसस्थानक येथे कर्तव्यावर होत्‍या. सकाळी ०६.१५ वाजेच्‍या सुमारास शिवनेरी बसमध्‍ये जाणाऱ्या प्रवशांनी बुकींग करुन त्‍या पेन आणण्यासाठी मध्‍यवर्ती बसस्‍थानका जवळील दुकानावर जात होत्‍या. त्‍यावेळी बसस्थानक परिसरात नेहमी फिरणारा खासगी वाहनांचा एजंट जाकेर खान  याने बळजबरी पीडितेचा हात पकडून चल तुला चहा पाजतो असे म्हणत हात ओढला. पिडितेने त्‍याला विरोध केला, त्‍याच वेळी तेथे आरोपीचे दोन साथीदार तेथे आले. ते पीडितेला एकमेकांच्‍या अंगावर ढकलून झोंबाझोंबी करु लागले. जाकेर याने वाईट हेतून पीडितेचे शर्ट धरुन ओढत विनयभंग केला. घाबरलेल्या पीडितेने आरडाओरड केल्याने तिचे सहकारी तेथे आले व त्‍यांनी पीडितेची सुटका केली. परंतु आरोपींनी पिडितेला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात तपास अधिकारी तथा तत्कालीन उपनिरीक्षक शिंदे यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी अतिरिक्त सरकारी लोकाभियोक्ता बाळासाहेब लोमटे यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी  जाकेर खान याला दोषी ठरवून भादंवी कलम ३५४ अन्‍वये एक वर्षे सक्तमजुरी आणि २५००० हजार रुपयांचा दंड, कलम ३२३, ५०४, ५०६ अन्‍वये एक महिना सक्तमजुरी आणि प्रत्‍येक कलमाखाली एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणुन जमादार पटेल यांनी काम पाहिले.