राज्यातील जनतेचे जीव वाचवा!प्रियांका गांधी यांचा सल्ला घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा- केशव उपाध्ये

मुंबई ,२२एप्रिल /प्रतिनिधी 

कोरोनाची महाराष्ट्रातील स्थिती अतिशय भयानक होत आहे. महाविकास आघाडी सरकार पुरते अपयशी ठरले आहे. स्वतः काहीच करायचे नाही आणि काहीही झाले की केंद्राच्या नावाने खडे फोडायचे, हा एकमेव उद्योग केला जात आहे. अशात काल प्रियांका गांधी एक मोठी मुलाखत दिलेली आहे. काय केले पाहिजे, याचे त्यांचे ज्ञान पाहता हवे तर त्यांची मदत घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन दिला, सर्वाधिक रेमडेसिवीरचा कोटा महाराष्ट्राला दिला. हा कोटा किती रुग्ण कोणत्या राज्यात ऑक्सिजनवर आहेत, हे पाहून दिलेला आहे. सुरुवातीपासून सर्वाधिक मदत मिळत असताना केवळ बोंबा करण्याचे काम वगळता महाविकास आघाडी सरकारने काहीही केलेले नाही. सर्वाधिक मदत मिळूनही सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, सर्वाधिक सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात अशीच स्थिती आहे. त्यामुळे हवे तर डॉ. मनमोहन सिंग यांनी लिहिलेल्या सर्व सूचना राज्यात अंमलात आणा, प्रियांका गांधी यांना काही दिवस राज्यात बोलवा, पण महाराष्ट्रातील स्थिती आता आटोक्यात आणली पाहिजे. बाकी विरोधी पक्ष म्हणून आणि केंद्रातील सरकार सुद्धा प्रारंभीपासून राजकारण न करता महाराष्ट्रासोबत आहे आणि यापुढे पण राहील. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांची चिंता तर अजिबात करू नका. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा करून आतापर्यंत अनेक बाबतीत राज्याला मदतच केली आहे आणि यापुढेही करतील. आपण प्रियांका गांधी यांच्या तज्ञतेचा फायदा महाराष्ट्राला कसा मिळेल, तेवढे फक्त पहा, असा सल्ला सुद्धा केशव उपाध्ये यांनी नाना पटोले यांना दिला आहे.