जालन्याच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला  दिलासा

Administrative Offices | District Jalna, Government of Maharashtra | India

औरंगाबाद ,दि.३ मार्च : 
जालना जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रतापराव सवडे यांनी औरंगाबाद प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) निकालाविरोधात हायकोर्टात धाव घेतली असता, त्यांची मुळ ठिकाणी बदली करणे चुकीची ठरेल असा युक्तीवाद करण्यात आला. न्या. संजय  गंगापूरवाला आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने प्राथमिक सुनावणीअंती, प्रकरणात जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले. याचिकेवर १५ मार्च रोजी पुढील सुनावणी होईल.
१५ सप्टेंबर २०१९ रोजी प्रतापराव सवडे यांची जालना जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर तर  कल्पना क्षीरसागर यांची जालना जिल्हा परिषदेअंतर्गत प्रोजेक्ट डायरेक्टर या पदावर बदली करण्यात आली. कार्यकाळ पूर्ण होण्या पूर्वीच बदली झाल्याच्या नाराजीने क्षीरसागर यांनी सदर आदेशाविरुद्ध मॅटमध्ये  धाव घेतली. सुनावणीअंती मॅटने क्षीरसागर यांच्या बदलीचा आदेश रद्द केला आणि त्यांना पुन्हा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर पदस्थापना देण्यात यावी असे आदेश दिले. त्यानाराजीने सवडे यांनी संभाजी टोपे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. गेल्या सहा महिन्यांपासून दोन्ही अधिकारी त्यांच्या बदली ठिकाणी कार्यरत असून सवडे यांना तात्काळ त्यांच्या पदावरुन हलविणे चुकीचे असल्याचा युक्तीवाद टोपे यांनी केला. क्षीरसागर यांच्यावतीने आनंद देवकते यांनी काम पाहिले.