वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी ३१ मार्चपर्यंत विधिमंडळ समिती नियुक्त करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

विधानसभा प्रश्नोत्तरे

मुंबई, दि. 3 : राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेचे विधिमंडळाच्या समितीमार्फत चौकशी करण्यात येईल. 31 मार्चपर्यंत समिती स्थापन होऊन त्यांना सुरुवातीला चार महिन्यांची मुदत देण्यात येईल त्यात आवश्यकता वाटल्यास दोन महिन्यांची मुदत वाढ देऊन या प्रकरणी सहा महिन्यात सभागृहाला अहवाल सादर केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य रमेश कोरगावकर यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी विशेष मोहीम राबविण्याकरीता सन 2016-17 ते 2019-20 या कालावधीत वन विभागाला 2 हजार 429.78 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. तो पूर्णपणे वापरण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत वन विभागाकडून 28.27 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. ऑक्टोबर 2020 अखेर त्यातील 75.63 टक्के रोपे जिवंत असून त्यांची देखभाल करण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत लागवड झालेले वृक्ष जगले पाहिजेत त्या खर्चासाठी शासन कुठल्याही निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही राज्यमंत्री श्री.भरणे यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, नाना पटोले, जयकुमार गोरे, प्रकाश सोळुंके, धर्मरावबाबा आत्राम यांनी भाग घेतला.

जळगाव महिला वसतीगृहातील घटनेच्या चौकशीसाठी चार अधिकाऱ्यांची समिती – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि. 03 : जळगाव येथील महिला वसतीगृहात घडलेल्या घटनेची चौकशी करण्याकरिता चार अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली असून त्याचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होईल. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत जाहीर केले.

विधानसभा सदस्य श्वेता महाले यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्यावर उत्तर देताना गृहमंत्री यांनी ही माहिती दिली.

राज्यातील १३ हजार ६५५ गृहनिर्माण संस्थांचे मानिव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) प्रक्रिया पूर्ण – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

मुंबई, दि. 3 : राज्यातील गृहनिर्माण संस्थांचे मानिव अभिहस्तांतरणासाठी (डीम्ड कन्व्हेअन्स) लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली असून याप्रक्रियेत सुसूत्रता आणली आहे, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले आहे.

सदस्य संजय पोतनिस यांनी राज्यातील गृहनिर्माण संस्थांची मानिव अभिहस्तांतरण प्रकरणी प्रलंबित असल्याबाबत प्रश्न विचारला होता. त्याच्या लेखी उत्तरात सहकार मंत्री श्री.पाटील यांनी म्हटले आहे की, राज्यातील संबंधित जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात 31 जानेवारी 2021 पर्यंत मानिव अभिहस्तांतरणाचे 14 हजार 822 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 13 हजार 655 अर्जांवर कार्यवाही करुन प्रमाणपत्र देण्यात आले आहे. उर्वरित 1167 अर्जांवर कार्यवाही सुरु असल्याचे श्री.पाटील यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.

नागपूरच्या समता प्रतिष्ठान संस्थेच्या कामांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 3 : नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेच्या कामांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक नेमण्यात येईल. या प्रकरणी प्रथम दर्शनी दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य सुनील प्रभू यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री श्री.मुंडे म्हणाले की, या संस्थेमार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त जे कार्यक्रम घेण्यात आले त्याच्या खर्चाचा ताळमेळ लागत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी पथकामार्फत केली जाईल, असेही श्री. मुंडे यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री नाना पटोले, सुधीर मुनगंटीवार यांनी भाग घेतला.