वर्ल्ड एक्स्पो दुबई येथे १५ हजार कोटींचे सामंजस्य करार,शेंद्रा आणि ऑरिकमध्ये होणार १२८० कोटींची गुंतवणूक

आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स ,एसीजी फार्मा आणि कोरियाची ह्योसंग या कंपन्या शेंद्रा आणि ऑरिकमध्ये येणार

मुंबई,२० नोव्हेंबर /प्रतिनिधी:- वर्ल्ड एक्स्पो, दुबई या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेत झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या परिषदेत २५ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आलेली असून रु. १५,२६० कोटींची गुंतवणूक राज्यात होणार आहे, या माध्यमातून दहा हजारापेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.यात औरंगाबादच्या शेंद्रा आणि ऑरिक या औद्दोगिक वसाहती मध्ये होणार १२८० कोटींची गुंतवणूक होणार आहे.

२० नोव्हेंबर रोजी उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या सामंजस्य करारात जापान, सिंगापूर, स्वीडन कोरिया जर्मनी इटली व भारत या देशांच्या कंपन्यांनी वाहन व वाहन घटक, लॉजिस्टिक्स, प्राणवायू उत्पादन, ईव्ही, टेक्सटाईल, डेटा सेंटर, औषध निर्माण, जैवइंधन व तेल आणि वायू ई. विविध क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. यासह आर्थिक आणि औद्योगिक सहकार्यासाठी आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाउंडेशनसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

भारतातील आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स ही कंपनी ३०० कोटींची गुंतवणूक ऑरिकमध्ये करणार असून २०० जणांना रोजगार मिळणार आहे.ही कंपनी ऑक्सिजनची निर्मिती करणार आहे.  एसीजी फार्मा ही कंपनी शेंद्रा आणि ऑरिकमध्ये ४७० कोटी गुंतवणार आहे.या कंपनीत ६०० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कोरियाची ह्योसंग या  कंपनीची   ५१० कोटींची गुंतवणूक शेंद्रा आणि ऑरिकमध्ये   होणार आहे, या माध्यमातून १५० जणांना  प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. 

याप्रसंगी अपर मुख्य सचिव (उद्योग) श्री. बलदेव सिंग, आयुक्त (उद्योग), श्री. हर्षदीप कांबळे, एमआईडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. पी. अनबलगन, सह.मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. ए. एस. आर. रंगा नाईक व महाव्यवस्थापक (पणन व जनसंपर्क) श्री. अभिजित घोरपडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

दि. ०१ ऑक्टोबर, २०२१ ते ३१ मार्च, २०२२ या कालावधी मध्ये दुबई (यूएई) येथे वर्ल्ड एक्स्पो या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनामध्ये १९० देश सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील उद्योजक/गुंतवणूकदार, शासकीय विभाग सहभागी झाले आहेत.

Image
Image

या प्रदर्शनात असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन दि. १९  नोव्हेंबर २०२१ रोजी मा. मंत्री (उद्योग), श्री. सुभाष देसाई  यांच्या हस्ते करण्यात आले आहे.