पाणी पुरवठा खंडीत करण्यासाठी गेलेल्या एमआयडीसी कर्मचार्‍याला बेदम मारहाण,कंपनी मालकला अटक

औरंगाबाद/प्रतिनिधी
वारंवार नोटीस देऊनही पाणी पट्टी न भरल्याने महाराष्ट्र मेटल कंपनीचा पाणी पुरवठा खंडीत करण्यासाठी गेलेल्या एमआयडीसी कार्यालयातील कर्मचार्‍याला कंपनी मालकाने बेदम मारहाण केल्याची घटना 2 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास एमआयडीसी चिकलठाणा परिसरात घडली.
प्रकरणात एमअयाडीसी सिडको पोलिसांनी बुधवारी दि.3 मार्चरोजी कंपनीचा मालक नईम अहमद बशीर अहमद (57, रा. बशीर कॉलनी, रोशन गेट) याला अटक केली.
प्रकरणात सांडू त्रिंबक नरवडे (57, रा. एमआयडीसी कॉलनी, रेल्वे स्टेशन) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, नरवडे हे महाराष्ट्र औद‍्योगि विकास महामंडळातील (एमआयडीसी) कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. एमआयडीसी चिकलठाणा येथील डब्ल्यू 65 महाराष्ट्र मेटल कंपनीचा पाणी पुरवठा रक्‍कम 39 हजार 24 रुपयांची थकबाकी होते. सदरील रक्‍कम भरणा करण्यासंदर्भात कंपनीला दोन ते तीन वेळेस नोटीस देवूनही कंपनीने रक्‍कम भरली नाही. 2 मार्च रोजी सकाळी नरवडे हे फिटर सुनिल आहेर याच्यासह कंपनीचा पाणी पुरवठा खंडीत करण्यासाठी गेले असता, कंपनीचा मालक नईम अहमद याने नरवडे यांना शिवीगाळ करुन त्यांची गळा धरला. व त्यांना जबर मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला.
आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली