‘घरोघरी तिरंगा’: चित्ररथाला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

औरंगाबाद,​५​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- ‘आझादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाबाबत जिल्हाभरात जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाने चित्ररथाची निर्मिती केली आहे. चित्ररथाच्या माध्यमातून मतदार आधार प्रमाणिकरण कार्यक्रम आणि कोविड लसीकरण अमृत महोत्सवाची देखील जनजागृती करण्यात येणार आहे.

May be an image of 8 people, people standing, bicycle and road

            या चित्ररथाला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज हिरवी झेंडी दाखवली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात हा कार्यक्रम पार पडला. अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते.

            चित्ररथाच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात जागृती निर्माण करावी. आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत प्रत्येकाने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरावर राष्ट्रध्वज फडकवावा. हे करत असताना सर्वांनी ध्वज संहितेचे पालन करावे.  यासह मतदार ओळखपत्र आधार कार्डला संलग्न करा. 15 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत 18 वर्षांवरील सर्वांना मोफत कोविड लसीकरणांतर्गत बुस्टर डोस देऊन  कोविड लसीकरण अमृत महोत्सव साजरा होत असल्याबाबत जागृत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले.

May be an image of tree and outdoors

राष्ट्रध्वज नागरिकांसाठी पोस्ट कार्यालयातही उपलब्ध

भारतीय राष्ट्रध्वज हे संपूर्ण राष्ट्रसाठी राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे. आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी ‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमांतर्गत मा. प्रधानमंत्री व संचारमंत्री भारत सरकार यांच्या संकल्पनेतून ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबविली जात आहे. या अंतर्गत सर्व भारतीयांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ध्वजाशी आपले नाते नेहमीच अनौपचारिक आणि संस्थात्मक राहिले आहे. स्वातंत्र्याचा 75 व्या वर्षी  राष्ट्र म्हणून एकत्रितपणे ध्वज घरी आणणे हे केवळ तिरंग्याची वैयक्तिक संबंधाचे नव्हे तर राष्ट्र उभारणीसाठी आपल्या वचन बद्धतेचेही प्रतीक आहे. ही भावना जागृत करणे ही या उपक्रमामागील कल्पना आहे. लोकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे आणि आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढविणे हा उद्देश आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबविली जाणार आहे. देशातील 20 कोटी घरामध्ये तिरंगा पोहचविणे हे उद्दिष्ट डोळयासमोर ठेऊन केंद्र सरकारने भारतातील पोस्ट ऑफिस मध्ये भारतीय राष्ट्रध्वज नागरिकांसाठी विकत घेण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.             नागरिकांनी या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन प्रवर डाकपाल  सुरेश बनसोडे मुख्य डाकघर ,औरंगाबाद यांनी केले आहे.

सार्वजनिक ग्रंथालयांसाठी तिरंगा ध्वजाचे निःशुल्क वितरण

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातील ४०० शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालय, शासकीय विभागीय ग्रंथालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यावतीने तिरंगा ध्वजाचे निःशुल्क वितरण करण्यात येणार आहे.

            सदर ध्वज वितरणाचा कार्यक्रम क्रांतिदिनी मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता औरंगाबाद येथील शासकीय विभागीय ग्रंथालय,समर्थ नगर,स्वातंत्र्यवीर सावरकर चौक या ठिकाणी सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे,ग्रंथपाल सुभाष मुंढे व जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

            औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या संबंधितानी या कार्यक्रमाला उपस्थित राहून तिरंगा ध्वज घेऊन जावे व हा ध्वज दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ध्वजाचा  सन्मान राखून योग्य पद्धतीने फडकविण्यात यावा असे आवाहन या तीनही कार्यालयांच्या वतीने करण्यात आले आहे.