महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां​च्या आयोजनातून मराठवाड्याला डावलले :आज दिनांक विशेष ​

क्रीडा स्पर्धेचे आयोजन ​ मराठवाड्यात ​करण्यास मिंधे सरकारला भाग पाडू​-​विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे ​ यांचा इशारा 

प्रमोद माने 

मुंबई /औरंगाबाद,१४ डिसेंबर :- ​महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा  जानेवारीत घोषित करण्यात आल्या आहेत, याचे आयोजन राज्यातील ​सहा ​ शहरांमध्ये होणार आहे.आयोजन करणाऱ्या शहरातून मराठवाडा विभागाला डावलले आहे. मराठवाडा ​विभागाची  राजधानी असणाऱ्या औरंगाबादलाही यातील काही खेळांच्या आयोजनातून  वगळले आहे​.हा एका विभागावर केलेला अन्याय आहे​.मराठवाडा विभागावर झालेला अन्याय सहन करणार नाही,औरंगाबादला (संभाजीनगर)दोन खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यास मिंधे सरकारला भाग पाडू असा इशारा विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिला आहे. 

भाजपचे ताकदवान मंत्री गिरीष महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पाच आमदार  आणि दोन कॅबिनेट मंत्री असणाऱ्या औरंगाबादला एकाही खेळाचे आयोजन दिले नाही. शिंदे गटाचे वर्चस्व असलेल्या औरंगाबादला मुद्दाम वगळले.एक प्रकारे शिंदे गटाला वाकुल्या दाखविण्याचे काम गिरीष महाजन यांनी केले आहे.भाजपचे गिरीष महाजन यांनी मराठवाडा विभागालाच डावलण्याचे धारिष्ट्य दाखवले आहे.आपल्या जळगाव जिल्ह्याचा समावेश आयोजन करणाऱ्या शहरामध्ये करुन शिंदे गटाला एक प्रकारे आव्हानच  दिले आहे. औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे ,कृषिमंत्री अब्दुल सत्तार,आमदार प्रदीप जैस्वाल ,आमदार संजय शिरसाट ,आमदार रमेश बोरणारे पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाचा त्याग करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट केले आहे.मराठवाडा सह औरंगाबादला वगळून  या पाच  लोकप्रतिनिधींना एक प्रकारे गिरीष महाजन यांनी आव्हानच दिले आहे.भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या शहरांमध्ये बारामतीला स्थान दिले आहे. बारामती हा  महाराष्ट्र ऑलिम्पिक​ संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांचा विधानसभा मतदारसंघ.बारामती  शहराला खेळाचे आयोजनपद देताना मराठवाडा विभागाला डावलले. 

मराठवाड्यातील एकाही शहरात या स्पर्धेचे आयोजन केले जाणार नाही.औरंगाबादमध्ये अनेक खेळांच्या आंतरराष्ट्रीय सुविधा आहेत.अत्याधुनिक क्रीडा  सुविधा असलेले साईचे केंद्र औरंगाबादला आहे.असे असतानाही ३९ खेळांच्या महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या आयोजनातून औरंगाबादला वगळून एक प्रकारे भाजपाने मराठवाड्यावर केलेला हा अन्यायच आहे अशी भावना मराठवाड्यातील क्रीडाप्रेमींची आहे. 

विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे​ यांनी यावर क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्यावर तोफ डागली आहे. मिंधे सरकारने केलेला हा अन्याय मराठवाड्यातील क्रीडाप्रेमी सहन करणार नाहीत. या स्पर्धेनिमित्त काढण्यात येणाऱ्या क्रीडा ज्योत यात्रेला मराठवाड्यात प्रवेश करु दिला जाणार नाही असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे. मराठवाड्यात दोन खेळांचे आयोजन करण्यास मिंधे सरकारला भाग पाडू असेही अंबादास दानवे​ म्हणाले. 

शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि एकेकाळी  मराठवाड्यातील क्रिकेट ,बॅडमिंटन गाजविणारे स्टार खेळाडू शिरीष बोराळकर यांनी या स्पर्धेतील काही खेळांचे आयोजन मराठवाड्यात झाले पाहिजे असे मत खेळाडू म्हणून व्यक्त केले.राज्यातील एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकार मराठवाड्यावर अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन बोराळकर यांनी दिले.

क्रीडाभरती  व औरंगाबाद ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनीही राज्यातील युतीचे सरकार निश्चितपणे काही खेळांचे आयोजन मराठवाड्यात करुन अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासित केले. 

———

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना २ जानेवारीपासून प्रारंभ – क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन

मुंबई : राज्यातील शहरी आणि विशेषत: ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रातून जगातील प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या दर्जाचे क्रीडापटू तयार व्हावेत, या हेतूने महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन १ ते १२ जानेवारी या कालावधीत करण्यात येणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री गिरीष महाजन यांनी बुधवारी केली.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, महाराष्ट्र शासन आणि क्रीडा व युवक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यामाने होणाऱ्या या क्रीडा स्पर्धा पुणे, मुंबई, जळगाव, नाशिक, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांत होणार असून, एकंदर ३९ क्रीडा प्रकारांचा यात समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक क्रीडा स्पर्धांना 2 जानेवारी 2023 पासून शिवछत्रपती क्रीडा संकुल,म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे  येथून सुरूवात होणार आहे. क्रीडा प्रकारानुसार राज्यातील निवडक शहरांच्या ठिकाणी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून या स्पर्धांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांकरिता खेळाडूंना उत्तम कामगिरी करण्याची संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्यााद्री अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा राज्यस्तर आयोजन समितीच्या बैठकीत या स्पर्धेच्या आयोजनासह स्थळे निश्चित करण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजितदादा पवार, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर उपस्थित होते. याशिवाय सुहास दिवसे (आयुक्त, क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणे), रणजित देवोल (सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग), चंद्रकांत कांबळे (सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय), तेजस्विनी सावंत (अर्जुन पुरस्कार विजेती नेमबाज), प्रदीप गंधे (ध्यानचंद पुरस्कार विजेते, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष), निलेश जगताप (महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य) आदी मान्यवर उपस्थित होते.

‘‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील क्रीडा क्षेत्राला एक नवीन आयाम आणि दिशा देण्याचा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा प्रयत्न आहे. या स्पर्धांतून नवे आणि ग्रामीण खेळाडू आकर्षित होतील. ही गुणवत्ता राज्यस्तरावर समोर येईल. या माध्यमातून कोणत्याही क्रीडापटूच्या ऑलिम्पिक स्वप्नासाठी ही पहिली पायरी असेल. या स्पर्धेत नवनवे विक्रम प्रस्थापित होतील. खेळाडू हा केंद्रबिंदू ठेवून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन यशस्वी करू,’’ अशी प्रतिक्रिया क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री.महाजन म्हणाले की, राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करून विविध खेळांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर आपले नैपुण्य दाखवित असलेल्या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा राज्यात पुणे, नागपूर, जळगाव, नाशिक, मुंबई, बारामती, अमरावती, आर्मी पोस्ट इन्स्टिट्यूट, पुणे तसेच पूना क्लब इत्यादी निवडक ठिकाणी भरविण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करणे व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा विभागामार्फत नियोजन करावे. यासाठी शासनस्तरावर पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

स्पर्धेनिमित्त क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजनही करण्यात येणार आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां सुरळीत पार पाडण्यासाठी क्रीडा विभाग व खेळाडूंच्या दृष्टीने सोयीचा विचार करून या स्पर्धांच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल त्याठिकाणी स्थानिक पातळीवर समिती गठित करण्याबाबत सूचनाही यावेळी मंत्री श्री. महाजन यांनी दिल्या.

सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत गुजरात मध्ये आयोजित ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्याने उल्लेखनीय कामगिरी करून १४० पदकांसह देशात पहिला क्रमांक मिळविला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. महाजन यांचा सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्रात साधारण २० ते २२ वर्षांनंतर ऑलिम्पिक स्पर्धा होत आहेत. या स्पर्धा ऐतिहासिक होतील. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा या क्रीडा क्षेत्राला नवीन दिशा देण्याचे काम करतील आणि यामुळे महाराष्ट्रातील खेळाडूंना नवीन स्पर्धा खेळण्याची संधी व अनुभव मिळेल,’’ असे मत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.

ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांच्या पावलांवर पाऊल टाकत ऑलिम्पिक पदकाच्या स्वप्नपूर्तीसाठी कृती आराखड्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे ही महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आहे. या स्पर्धेद्वारे ग्रामीण भागातील क्रीडापटूंना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले जाईल,’’ असे अजितदादा पवार यांनी पुढे सांगितले.

तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, कॅनोइंग आणि कयाकिंग, तलवारबाजी, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हँडबॉल, हॉकी, ज्युडो, कबड्डी, खो-खो, टेनिस, मॉडर्न पेंटॅथलॉन, नेमबाजी, रोइंग, रग्बी, जलतरण-वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वांदो, ट्रायथलॉन, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, सायकलिंग (रोड आणि ट्रॅक), नेटबॉल, सेपक टेकरॉ, स्क्वॉश, यॉटिंग अशा ३२ क्रीडा प्रकारांसह नुकत्याच गुजरात येथे झालेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मल्लखांब, सॉफ्टबॉल, योगासन, रोलर स्केटिंग, सॉफ्ट टेनिस, गोल्फ आणि विशेष बाब म्हणून शूटिंगबॉल अशा सात क्रीडा प्रकारांचा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा चषक क्रीडामंत्र्यांना सुपूर्द

गुजरातला झालेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी ३९ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ६३ कांस्य अशी एकूण १४० पदकांची लयलूट करीत सर्व राज्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. हा चषक महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सुपूर्द केला.