जालना जिल्ह्यातील कंन्टेन्टमेंट झोनमध्ये नियमांचे काटेकारपणे पालन व्हावे

कंन्टेन्टमेंट झोनमधुन एकही व्यक्ती बाहेर पडणार नाही याची दक्षता घ्या

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे निर्देश

जालना, दि. 5 :- जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असुन जालना शहरामध्ये 83 कोरोना बाधित रुग्ण आहेत. ही अतिशय चिंतेची बाब असुन कोरोनाचे संक्रमण होऊ नये यादृष्टीकोनातुन जिल्ह्यातील 38 कंन्टेन्टमेंट झोनमध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. तसेच या झोनमधुन एकही व्यक्ती विनाकारण बाहेर पडणार नाही, यासाठी पोलीस विभागाने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.

कोरोनाविषाणुच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी श्री कडले, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, श्री लोहकरे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या कमी होती. परंतू परराज्य, परजिल्ह्यातुन अनेक व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाल्या असुन लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्याने नागरिकांचा वावरही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कंटेन्टमेंट झोन म्हणून घोषित केलेल्या भागात हायरिस्क व लोरिस्क सहवासितांचा काटेकोरपणे शोध घेण्यात यावा. कंन्टेन्टमेंट झोनचे सुक्ष्मपणे रेखांकन करण्याबरोबरच या झोनचा कालावधी 28 दिवसांपर्यंत ठेवण्यात यावा. प्रत्येक कंन्टेन्टमेंट झोनमध्ये येण्या व जाण्यासाठी असलेले सर्व मार्ग बंद करण्यात येऊन येण्या व जाण्यासाठी एकच मार्ग तयार करण्यात यावा. या भागामध्ये असलेल्या नागरिकांना आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा घरपोहोच करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात येऊन या भागातील एकही व्यक्ती विनाकारण रस्त्यावर फिरणार नाही, याची सर्व संबंधितांनी दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिले.

कंन्टेन्टमेंट झोनमध्ये नायब तहसिलदार, पोलीस निरीक्षक, नगर पालिका, जिल्हा परिषद तसेच स्वयंसेवी संस्था यांचा समावेश असलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाची नेमणुक करण्यात येऊन या पथकामार्फत निर्बंधाची कडक अंमलबजावणी होण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी. या भागामध्ये मधुमेह, रक्तदाब यासह इतर आजार असलेले व्यक्ती, गर्भवती महिला, लहान बालके, वयोवृद्ध असलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घेण्यात यावी. तसेच होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींनी घरातच राहणे अनिवार्य असुन होमक्वारंटाईन केले असतानासुद्धा बाहेर कोणी फिरताना आढळल्यास अशा व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिले.

जीवनावश्यक तसेच ईतर आवश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. प्रत्येक दुकानामध्ये सामाजिक अंतराचे पालन करणे अत्यंत आवश्यक असुन या ठिकाणी सॅनिटायजर, मास्क यासारख्या बाबींचेही पालन करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी सामाजिक अंतराचे तसेच प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे पालन होताना दिसणार नाही, अशा ठिकाणी कडक कारवाई करण्यात यावी. तसेच मार्केटमध्ये होणारी वाहनांची गर्दी टाळण्यासाठी मार्केटबाहेर पार्कींगची व्यवस्था करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

जालना जिल्ह्यातुन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतू नागरिकांनीही कोरोनाला अटकाव करण्यासाठी सामाजिक अंतर, सॅनिटायजर, मास्कचा वापर तसेच आवश्यकता असेल त्याचवेळी घराबाहेर पडावे. अन्यथा आपल्या घरातच रहावे. प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *