प्रभावी कचरा व्यवस्थापनातून जैव-विविधतेचे रक्षण

MoHUA releases three key advisories to mark World Environment Day

गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनेक मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली, 5 जून 2020

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज नवी दिल्लीत निर्माण भवन येथे अनेक मार्गदर्शक सूचना जारी केल्या. ‘प्रभावी कचरा व्यवस्थापनाद्वारे जैव-विविधतेचे रक्षण” असा कार्यक्रम आज ‘वेबकास्ट’ करण्यात आला. यावेळी गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाचे सचिव, दुर्गा शंकर मिश्रा व सहसचिव तसेच स्वच्छ भारत अभियान-नागरीचे राष्ट्रीय अभियान संचालक, व्ही. केजिंदाल उपस्थित होते.

यावेळी जारी करण्यात आलेल्या तीन महत्वाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये, ‘महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्यातून पुनर्प्रक्रियायोग्य वस्तू वेगळ्या करण्याविषयीच्या मार्गदर्शक सूचना’, ‘क्षेपणभूमी पुनर्वापरविषयक मार्गदर्शक सूचना’, तसेच ‘प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सांडपाणी व्यवस्थापन पद्धतीविषयक मार्गदर्शनपर दस्तऐवज’ यांचा समावेश आहे. स्वच्छ भारत अभियान-नागरी अंतर्गत कार्यरत, केंद्रीय सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेने या मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत.

याप्रसंगी बोलताना, हरदीप पुरी यांनी सांगितले, आज आपल्याला जैव-विविधता संरक्षण आणि प्रभावी कचरा व्यवस्थापन यातील परस्परसंबंध पुनर्स्थापित करण्याची संधी मिळाली आहे. स्वच्छता आणि जैव-विविधतेचे रक्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान-नागरीची 2014 साली सुरुवात केली, तेव्हा त्याची दोन उद्दिष्टे होती. एक तर शहरी भारताला उघड्यावर शौच पद्धतीतून मुक्त करणे आणि शास्त्रीय पद्धतीने 100 टक्के घनकचरा व्यवस्थापन. आपण या दोन्ही क्षेत्रात महत्वाची प्रगती केली आहे. आज जवळपास संपूर्ण शहरी भारतात उघड्यावर शौचाची प्रथा बंद झाली आहे आणि घनकचऱ्याचे शास्त्रीय दृष्ट्या विघटन, जे 2014 पर्यंत केवळ 18 टक्के होते, ते आता जवळपास तिप्पट झाले असून, सध्या त्याचे प्रमाण 65 टक्के इतके आहे. मात्र आज, माझ्या मंत्रालयातर्फे ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या गेल्या आहेत त्या सूचना म्हणजे, समग्र स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी एक शाश्वत तोडगा काढण्यात उपयुक्त ठरतील.

यावेळी मंत्रालयातर्फे, विष्ठा व्यवस्थापन विषयक संवादात्मक मोहिमेसाठीच्या ‘मलासूर-द डेमन ऑफ डीफिका’ या  ‘टूल कीट’चे ही उद्घाटन करण्यात आले. याचा उद्देश विष्ठा घनकचऱ्यापासून असणाऱ्या धोक्यांविषयी जागृती करणे हा आहे. ‘बीबीसी मिडीया ऍक्शन’ यांची संकल्पना आणि रचना असलेल्या या ‘टूल कीट’ मध्ये इंग्रजीसह 10 भारतीय भाषांमधून माहिती देण्यात आली आहे.

आजच्या दिवसाचे महत्व आणि या मार्गदर्शक सूचना यांच्याविषयी सविस्तर माहिती देत, पुरी यांनी सांगितले की, “ या सूचनांचे प्रकाशन होण्यासाठी आजच्यापेक्षा अधिक योग्य दिवस नव्हता. MoHUA विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षमता वाढवण्याकडे सातत्याने लक्ष देत आहे, ज्यात, घनकचरा व्यवस्थापन आणि संपूर्ण स्वच्छतेवर – सांडपाणी प्रक्रिया, अशा सर्व बाबींचा समावेश आहे. त्यासाठी केवळ पायाभूत सुविधा निर्माण करणे पुरेसे नाही, तर क्षमता बांधणी आणि मानसिक पातळीवर बदल घडवणे आवश्यक आहे. आज जागतिक पर्यावरण दिनी, मला पुन्हा एकदा MoHUA विभाग सर्व प्रकारच्या जीवांचे संवर्धन करण्यास कटीबद्ध आहे, असे म्हंटले. आणि हे तेव्हाच साध्य करता येईल, जेव्हा आपण स्वच्छतेचा मंत्र पुढेही आचरणात आणू आणि हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा आपण तीन ‘आर’ची पूर्ण क्षमता वापरत आणू. मला विश्वास आहे, की यामुळे आपल्याला सुधारित सार्वजनिक आरोग्य आणि उत्तम जीवनशैली मिळेल. तसेच, रोजगार निर्मिती, असंघटीत मजुरांना एकत्रित करणे, महसूल निर्मिती आणि कचऱ्यातून नव्या उत्पादनांचे निर्माण ही उद्दिष्टे देखील साध्य केली जातील.

घनकचरा व्यवस्थापन आता केवळ स्वच्छ या विषयाकडे लक्ष देत नाही, तर स्वस्थ, सशक्त, संपन्न आणि आत्मनिर्भर अशा सर्वच बाजूचा विचार करत आहे. त्यामुळे, आता आपण सगळे पुन्हा एकदा आपला देश आणि या देशातील हवा, भूमी आणि जलक्षेत्र स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा करुया, असे त्यांनी सांगितले.

या प्रकाशनानंतर लगेचच “भारतातील सांडपाण्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष व्यवस्थापनविषयक मसुदा मार्गदर्शक सूचना’’ या विषयावर आभासी कार्यशाळा घेण्यात आली. यात 100 व्यक्तींनी सहभाग घेतला. यात विविध राज्यांचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी तसेच तज्ज्ञ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *