गोदावरी, पुर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांना सर्तकेचा इशारा

नांदेड, दि. 21 :- उर्ध्व पैनगंगा प्रकल्प उर्ध्व, उर्ध्व मानार प्रकल्प व निम्न मानार प्रकल्पही शंभर टक्के भरले असल्याने त्यांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस / अतिवृष्टी झाल्यास पाणी नदीत सोडण्यात येणार आहे. गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे, वेळोवेळी नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गाची माहिती जलसंपदा विभागाच्या नियंत्रण कक्षात दूरध्वनी क्र. 02462-263870 वर मिळू शकेल, असे आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता स. को. सब्बीनवार यांनी केले आहे.

जायकवाडी प्रकल्पाचे पाणी विष्णुपुरी प्रकल्पात पोहचले असून 10 दरवाज्यातून 1 लाख 10 हजार 200 क्युसेकसने विसर्ग चालू आहे. नदीमधून येणारा येवा जास्त असला तरी विष्णुपुरी प्रकल्पाद्वारे तो नियं‍त्रीत करण्याचा प्रशानाचा प्रयत्न राहील व विसर्ग नियं‍त्रीत केला जाईल. जायकवाडी प्रकल्पातून पर्जन्यमानात घट झाल्यामुळे सोडण्यात येत असलेला विसर्ग कमी करुन 37 हजार 830 क्युसेकस विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. निम्न दुधना प्रकल्पातून 25 हजार 230 क्युसेकस विसर्ग पुर्णा नदीत सोडण्यात येत आहे. माजलगाव या मोठया प्रकल्पातून 31 हजार 420 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. पुर्णा प्रकल्पाच्या (येलदरी व सिध्देश्वर) पाणलोट क्षेत्रातून पुर्णा नदीत 36 हजार क्युसेक्स विसर्ग चालू आहे. या सर्व नद्यांचे पाणी गोदावरी नदीला मिळते. त्याचा एकूण विसर्ग 1 लाख 30 हजार 480 क्युसेकस आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास विसर्गात वाढ होऊ शकते.

सद्य:स्थितीत नांदेड शहरात पुर परिस्थिती नियंत्रणात आहे. सद्य:स्थितीत नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरणसुध्दा 100 टक्के भरले असून तेथून 1 लाख 25 हजार क्युसेकस विसर्ग चालू आहे. पोचमपाड प्रकल्प शंभर टक्के भरला असल्याने गोदावरी नदीत फुगवटा निर्माण होतो. सध्या जुन्या पुलावर पाणीपातळी 348.82 मीटर आहे. इशारा पातळी 351 तर धोका पातळी 354 मीटर इतकी आहे. इशारा पातळीचा विसर्ग 2 लाख 13 हजार क्युसेकस व धोका पातळीचा विसर्ग 3 लाख 9 हजार 774 क्युसेकस आहे, अशी माहिती नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता स. को. सब्बीनवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *