चांद्रयान-२ ने केले चांद्रयान-३ चे स्वागत! लँडिंगनंतर चांद्रयान साकारणार अशोकस्तंभ

कसा झाला दोन्ही यानांचा संपर्क?

आता लँडिंगसाठी उरले केवळ ३६ तास…

श्रीहरीकोटा : भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिमेत लँडिंग प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे आहे. या मोहिमेच्या निमित्ताने भारत दोन विक्रम करणार आहे. प्रथम, सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाल्यास, भारत हा पराक्रम करणारा अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा देश बनेल. तर दुसरा विक्रम म्हणजे चांद्रयान-३ चंद्रावर अशोकस्तंभ हे राष्ट्रीय चिन्ह बनवेल. या लँडिंगसाठी आता केवळ ३६ तास उरले असून २३ ऑगस्टला संध्याकाळी ६:०४ वाजता ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.

चांद्रयान-१ आणि चांद्रयान-२ मोहिमांचे प्रकल्प संचालक एम. अण्णादुराई यांच्या मते, २३ ऑगस्टच्या संध्याकाळी चांद्रयान-३ च्या सॉफ्ट लँडिंगची शेवटची १५ ते २० मिनिटे सर्वात गंभीर आहेत. लँडरला २५ किमी उंचीवरून चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागतील. यानंतर, सहा चाकी प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून रॅम्पमधून बाहेर येईल आणि इस्रोकडून आदेश मिळताच चंद्राच्या पृष्ठभागावर जाईल. या दरम्यान, भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आणि इस्रोचा लोगो चाकांच्या माध्यमातून चंद्राच्या मातीवर आपली छाप सोडेल.

दरम्यान, आणखी एक विशेष बाब म्हणजे चांद्रयान-३ चा अवकाशात चांद्रयान-२ शी संपर्क झाला आहे. २०१९ मध्ये भारताने आपले मिशन चांद्रयान-२ लॉन्च केले होते, पण अगदी शेवटच्या क्षणी चांद्रयान-२ चे लँडर क्रॅश झाले. याचे ऑर्बिटर मात्र गेल्या ४ वर्षांपासून चंद्राभोवती फिरत आपले काम करत आहे. आता चार वर्षांनंतर विक्रम लँडर पुन्हा चंद्राजवळ पोहोचले असून, यामुळे चांद्रयान-२ चे ऑर्बिटर सक्रिय झाले आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरने चांद्रयान-३ च्या लँडर मॉड्यूलचे स्वागत केले. दोघांमध्ये द्विपक्षीय संपर्कही प्रस्थापित झाला आहे.

चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी आता फक्त ३६ तास उरले आहेत. चांद्रयान-३ च्या लँडिंगसाठी इस्रोने तयारी पूर्ण केली आहे. रविवारी चांद्रयान-३ चंद्रापासून २५ किलोमीटर अंतरावर होतं. आता चांद्रयान-३ चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत त्याच्या आणखी जवळ जात आहे. प्रत्येक क्षणाला चंद्रापासून चांद्रयानचे अंतर आणि वेग कमी होत आहे. पुढील ४८ तासांत चांद्रयान-३ चा वेग आणखी कमी होईल आणि ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल. चांद्रयानाचे यशस्वी लँडिंग हा भारतासाठी एक महत्त्वाचा आणि गर्वाचा क्षण असणार आहे.