नागरिकांना ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन द्याव्यात-सेवा हक्क आयुक्त किरण जाधव यांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर,२२ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- म्हाडा मार्फत सर्वसामान्यांना द्यावयाच्या विविध सेवा सुविधांच्या लाभासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रे, अर्ज स्विकृती व कार्यवाही या प्रक्रिया गतिने व विहित कालावधीत व्हाव्यात यासाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब यंत्रणांनी करावा, असे निर्देश राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त किरण जाधव यांनी आज म्हाडा येथे दिले.

म्हाडा येथे आज सेवा हक्क आयुक्तांनी आढावा घेतला. बैठकीस म्हाडाचे मुख्याधिकारी मंदार वैद्य, उपमुख्य अधिकारी जयकुमार नामेवार, विभागातील संबंधित अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. जयकुमार नामेवार यांनी म्हाडा मार्फत दिल्या जाणाऱ्या 14 प्रकारच्या ऑनलाईन सेवांचे सादरीकरण केले.

श्री. जाधव म्हणाले की, मराठवाडा विभागातील म्हाडा अंतर्गत आठही जिल्ह्यांत सर्वसामान्यांना परवडतील अशा घरांची निर्मिती व त्याचा लाभ देत असतांना संवेदनशीलतेने व वेळेत दिला जावा. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत घरपोच, मोबाईलद्वारे ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या माध्यमातून सेवा द्यावी. सेवा हक्क अधिनियमांची अंमलबजावणी करीत असतांना येणाऱ्या तक्रारी व अपिल यावर देखील वेळेत सुनावणी घेऊन नागरिकांच्या तक्रारी निकाली काढाव्यात, असेही त्यांनी सांगितले. तसेच सेवा हक्क अधिनियमाविषयी मार्गदर्शन केले.