औरंगाबाद मनपा क्षेत्रातील शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद राहणार

औरंगाबाद जिल्ह्यात शाळा सोमवारपासूनच

औरंगाबाद, दिनांक 21 :   
राज्य सरकारच्या आदेशाची औरंगाबादेत अंमलबजावणी होणार असून ग्रामीण भागातील शाळा येत्या सोमवारपासूनच सुरू होणार आहेत. मात्र औरंगाबाद शहरातील शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. अशी माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. 

 जिल्ह्यात कोरोनाचा एकही कंटेन्मेंट झोन नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील ८२४ शाळांत नववी ते बारावीचे वर्ग सोमवार पासून सुरु करण्याचा निर्णय शनिवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला.जिल्हाधिकारी निवासस्थानी चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडे, जिल्हा परिषद सीईओ मंगेश गोंदावले, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी बी चव्हाण यांची उपस्थिती होती.

 जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, शहरी आणि ग्रामीण परिस्थिती व तेथील समस्या वेगळ्या आहेत. ग्रामीणमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या घटत असुन रुग्ण बरे होण्याचा दर 96 टक्के आहेत. शहरापेक्षा मृत्यु दरही कमी आहे. शिक्षणासाठी शाळाच सर्वात उत्तम माध्यम मुलांसाठी असल्याने व ऑनलाईन शिक्षणाच्या साधनांची कमतरता आणि नेटवर्कच्या समस्यांमुळे राज्य शासनाच्या नववी ते बारावीच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून सुरु करण्याच्या अनुकूल निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी 7130 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी नियोजनबद्ध पद्धतीने पुर्ण केली जात आहे. शनिवारी दुपार पर्यंत साडेचार हजार शिक्षकांची तपासणी झालेली असुन त्यातून 9 जण पॉझिटिव्ह आले आहे. हे प्रमाण चिंता करण्यासारखे नाही. सोमवार पर्यंत सर्व तपासण्या पूर्ण होतील. शिक्षकांना आरटीपीसीआर तपासणी शिवाय शाळेत जाता येणार नाही. तर पालकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत घेतल्या जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.  

महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी महापालिका क्षेत्रातील शाळा विद्यार्थ्यांसाठी तीन जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दिवाळीनंतर गेल्या काही दिवसात औरंगाबाद शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे या सर्वांचा विचार करुन त्यांनी शनिवारी आपला निर्णय जाहीर केला. त्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील शाळा तीन जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बंदच असतील. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गरजेनुसार शाळेत जाऊन काम करु शकतील. दहा डिसेंबररोजी करोना परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असून त्यानंतर पुढील धोरण ठरवले जाणार आहे.औरंगाबाद शहरात इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या ३६१ शाळा असून त्यात सुमारे ७८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या १७ शाळांमधून इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग आहेत आणि १९०४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आता या विद्यार्थ्यांना घरी बसूनच ऑनलाईन पध्दतीने शिक्षण घ्यावे लागणार आहे. 

ठाणे जिल्हा, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या ठिकाणीही शाळा ३१ तारखेपर्यंत बंदच राहणार आहेत. संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

२३ नोव्हेंबरपासून राज्यांमधल्या शाळा उघडल्या जाव्यात, असे आदेश राज्य सरकारने दिले होते. मात्र त्याचवेळी शाळा उघडण्याचा निर्णय त्या त्या जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनांनी घ्यावा, असेही म्हटले आहे. काल  मुंबई महापालिका प्रशासनाने ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा उघडणार नसल्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत उघडणार नाहीत हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शाळा या ऑनलाईनच सुरु राहण्याची शक्यता आहे.