औरंगाबाद शहर सहा महिन्यात कचरामुक्त करण्यासाठी प्रयत्न -– पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

चिखलठाणा येथील 150 मे.टन घनकचरा प्रकल्पाचे लोकार्पण

Image may contain: 5 people, people standing

औरंगाबाद, दिनांक 16 : विविध विकासकामांचे लोकार्पण होत आहेत, शहराच्या विकासासाठी ते महत्त्वपूर्ण आहे. शहरात तीन ठिकाणी घनकचरा प्रकल्प उभारल्यामुळे आगामी सहा महिन्यात औरंगाबाद शहर कचरामुक्त करण्यासाठी प्रयत्न होईल, असा आशावाद पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

चिकलठाणा येथे 150 मे. टन क्षमतेच्या घन कचरा प्रकल्पाचे लोकार्पण श्री. ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले.  यावेळी ते बोलत होते. उद्योग तथा पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदिपान भूमरे, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, उदयसिंह राजपूत, विनोद घोसाळकर, चंद्रकांत खैरे, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय आदींची उपस्थिती होती.

पर्यावरण मंत्री ठाकरे म्हणाले, औरंगाबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. शहराच्या विकासासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून घनकचरा प्रकल्प उभारण्यात आली आहेत. स्वच्छ, सुंदर औरंगाबाद होण्यासाठी कचरा प्रकल्प उपयुक्त असून नागरिकांनीही जबाबदारीने कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. सध्या जिल्ह्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणात आली आहे, मात्र ‘मिशन झिरो’ चा अवलंब करून औरंगाबादला कोविडमुक्त करावे. नागरिकांनी मास्कचा नियमित वापर, वारंवार हात धुवावेत आणि शारीरिक अंतर राखण्यासाठी सर्वांनी आग्रही राहावे , असे आवाहनही श्री. ठाकरे यांनी यावेळी केले.

सुरवातीला मंत्री श्री. ठाकरे यांच्याहस्ते कोनशिलेचे अनावरण करून कचरा प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात मंत्री श्री.ठाकरे यांच्याहस्ते मनपाच्या अधिकाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर वृक्षरोपनही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त श्री. पांडेय यांनी तर सूत्रसंचालन प्रविणा कन्नडकर यांनी केले.