औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहिम :पहिल्या दिवशी 647 आरोग्य सेवकांचे लसीकरण

औरंगाबाद, दि. 16 – जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दिवशी आरोग्य विभागातील 647 अधिकारी, कर्मचा-यांना कोरोनाची लस देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

आज सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत बन्सीलाल नगर येथील आरोग्य केंद्रावर कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी खासदार डॉ भागवत कराड, आमदार अतुल सावे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर व जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी, डॉक्टर, अधिपरिचारीका, कर्मचारी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरणासाठी आज पहिल्या दिवशी ग्रामीण भागातील सिल्लोड (79), पाचोड (46), अजिंठा (54)आणि वैजापूर (33) आणि शहरातील घाटी (74), सिडको एन 11 (81), सिडको एन आठ (80), बन्सीलाल नगर (81), सादात नगर (69), भीम नगर (50) येथील केंद्रावर एकूण 647 आरोग्य सेवकांना कोरोनाची लस देण्यात आली. जिल्ह्यात कोरोनाची लस देण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वात महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेळके, डॉ विजयकुमार वाघ यांच्यासह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने परिश्रम घेऊन ही लसीकरणाची मोहिम यशस्वीपणे पार पाडली.

लसीकरणाची सुरुवात कोरोनाच्या लढाईतील महत्वपूर्ण पाऊल-पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद,दि.16-गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना विरोधातील लढाईत संसर्गाला रोखण्याच्या दिशेने लसीकरणाची सुरुवात हे एक महत्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री  सुभाष देसाई यांनी आज जिल्ह्यातील लसीकरण शुभारंभ प्रसंगी  केले.

रेल्वे स्टेशन रोडवरील बंसीलाल नगर मनपा आरोग्य केंद्र येथे औरंगाबाद जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेची सुरुवात पालकमंत्री श्री. देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, आ. संजय शिरसाठ, अतुल सावे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा  आयुक्त आस्तीक कुमार पांडेय,  मनपा आरोग्य  अधिकारी डॉ. निता पाडळकर, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्यासह संबंधित मान्यवर, लसीकरण लाभार्थी उपस्थित होते.

Image may contain: 4 people, people standing

यावेळी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, आज देशभरात लसीकरण मोहिमेची सुरुवात होत असून जिल्ह्यातही आज 10 केंद्रांवर एक हजार जणांना लस देण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरापासून आपण सर्वांच्या साथीने कोरोना विषाणुविरोधात जो लढा देत आहोत त्यातील एक महत्वाचे आणि दिलासादायक पाऊल आपण लसीकणाच्या माध्यमातून आज टाकत आहोत ते निश्चितच यशस्वी होईल, असे सांगून श्री. देसाई म्हणाले, कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यशासन युद्धपातळीवर प्रयत्नशील असून या लसीमुळे आपल्या सर्वांना या रोगापासून संरक्षण प्राप्त व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे. ती यशस्वी होत सर्वांना आरोग्य लाभावे अशा शुभेच्छा लसीकरण मोहिमे निमित्त व्यक्त करत श्री. देसाई यांनी डॉक्टर, आरोग्य यंत्रणेतील सर्व कर्मचारी तसेच इतर सर्व यंत्रणांच्या प्रयत्नांमुळे संसर्गाचे वाढते प्रमाण वेळीच रोखू शकलेलो आहोत. त्याचप्रमाणे जिल्हयात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वाढते राहिलेले असून लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने सुरु असलेले आपल्या सर्वांचे प्रयत्न यशस्वी होतील, याची खात्री आहे. मात्र तरीही जनतेने खबरदारी कायम ठेवत मास्कचा वापर व इतर नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्ह्यातील लसीकरणाचे पहिले मानकरी बालरोग तज्ञ डॉ. राजेंद्र वैद्य यांनी लसीकरण मोहिमेची सुरुवात ही महत्वपूर्ण बाब असून जनतेने कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता लस घ्यावी, असे आवाहन करुन डॉ. वैद्य यांनी कोरोना लस घेण्याचा पहिला मान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.