शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांनी पदभरती प्रक्रिया वेळेत राबवावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

औरंगाबाद,२५ जानेवारी / प्रतिनिधी :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांनी कोरोना काळात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडलेली असून महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पदभरती प्रक्रिया वेळेत राबवावी अशा सूचना वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आज येथे दिल्या.

Displaying govt medical hospital and collage-5.JPG

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील सभागृहात मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोना रुग्णसंख्या, सेवासुविधा व उपाय योजनाबाबतच्या आढावा बैठकीत श्री.देशमुख बोलत होते. यावेळी बैठकीस औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके, खासदार इम्तियाज जलील, माजी आमदार कल्याण काळे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, घाटीच्या अधिष्ठाता डॉ.वर्षा रोटे, दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शंकर डांगे, जळगावचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, नंदूरबारचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे, धुळ्याच्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे, लातूरचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, नांदेडचे अधिष्ठाता डॉ.पी.टी.जमदाडे, अंबाजोगाईचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Displaying govt medical hospital and collage-2.JPG

श्री.देशमुख यांनी उपस्थित सर्व अधिष्ठातांद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या समस्या ऐकूण घेत त्या सोडवण्याच्या दृष्टीने विविध सूचना दिल्या. त्याचबरोबर सर्व शासकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या फायर ऑडिटची माहिती त्यांनी यावेळी घेतली. तसेच विद्यार्थी व रुग्ण यांना सुविधा द्याव्यात. वैद्यकीय सेवा सुरळीतपणे प्रदान करण्याच्या दृष्टीने संबंधित महाविद्यालयांनी मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी पदभरतीस ही शासनाने मंजूरी दिली असून संबंधित विभागांद्वारे पदभरती वेळेत करण्याच्या सूचनांही त्यांनी यावेळी दिल्या. औरंगाबाद येथे फिजिओथेरेपी आणि ऑक्युपेश्नल अभ्यासक्रम  सुरू करणे, नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीचे नुतनीकरण, खेळाचे मैदान, वाहनतळाचे विस्तारीकरण, आदी सुविधांची मागणी असून ती पूर्ण करण्यात येईल. तसेच सर्व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आधुनिक यंत्रसामुग्री, विद्यार्थ्यांसाठी वाढीव वसतीगृहांच्या खोल्यांची संख्या, महाविद्यालयाच्या सुरक्षारक्षकांची व्यवस्था, आदी मागण्याही पूर्ण करण्यात येणार असल्याचे श्री.देशमुख यांनी  सांगितले. त्याचबरोबर सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांनी त्यांना आवश्यक असलेल्या बाबींचा आराखडा तयार करुन परिपूर्ण प्रस्ताव वेळेत सादर करावेत म्हणजेच या प्रस्तांवावर येणाऱ्या अर्थसंकल्पात तरतूद करता येईल असे श्री.देशमुख यांनी यावेळी सांगितले. खासदार इम्तियाज जलील यांनी रुग्णांना औषधी खरेदी बाहेरुन करावी लागत असल्याबाबत लक्ष वेधले असता श्री.देशमुख यांनी अधिष्ठांना औषधीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवण्याची सूचना केली.

Displaying govt medical hospital and collage-3.JPG

मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा आकडा वाढलेला दिसत असला तरी रुग्णांमधील लक्षणे ही सौम्य प्रकारची आहेत. पहिल्या व दुसऱ्या लाटेसारखी तणावाची स्थिती नाही. तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे हे सुरक्षा कवच लाभलेले आहे. आजची रुग्णसंख्या ही महिनाभरात कमी होऊ शकते तरी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे तंतोतत पालन करण्याचे आवाहन श्री. देशमुख यांनी यावेळी केले.