महाराष्ट्राला तीन ‘परम विशिष्ट सेवा पदक’ राज्याच्या एकूण 1४ सेना व नौदलाच्या अधिकारी-जवानांना ‘शौर्य पदक’

नवी दिल्ली,२५ जानेवारी / प्रतिनिधी :-   लष्कराच्या सेनाधिकारी व महाराष्ट्रकन्या ले.जनरल माधुरी कानिटकर(सेवानिवृत्त) ,ले.जनरल मनोज पांडे  तसेच नौदलाचे व्हाईस ॲडमिरल सतिशकुमार घोरमाडे यांना ‘परम विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाले असून मुळचे महाराष्ट्राचे असलेल्या अन्य ११ अधिकारी व जवानांना ‘शौर्य पदक’ जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्राला तीन ‘परम विशिष्ट सेवा पदक’  राज्याच्या एकूण 1४ सेना व नौदलाच्या अधिकारी-जवानांना ‘शौर्य पदक’

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज लष्कराच्या एकूण 317 आणि नौदलाच्या एकूण ३४ सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘शौर्य पदक’ मंजूर केले आहेत. या पदकांमध्ये २२ ‘परम विशिष्ट सेवा पदक’ (पीव्हीएसएम),४ ‘उत्तम युध्द सेवा पदक’(युवायएसएम),४० ‘अती विशिष्ट सेवा पदक’(एव्हीएसएम) ,६ ‘शौर्य चक्र’, ८४ ‘सेना पदक’ (शौर्य)  ,१० ‘युध्द सेवा पदक’,  ४० ‘सेना पदक’ (विशिष्ट सेवा), ९३ ‘विशिष्ट सेवा पदक’ तसेच लष्कराच्या विविध ऑपरेशनसाठी ४४ पदक आणि नौदलाच्या ८ नौसेना पदकांचा समावेश आहे.

यामध्ये मूळच्या महाराष्ट्राच्या असलेल्या लष्कर व नौदलाच्या सेना अधिकारी व जवानांना ३ ‘परम विशिष्ट सेवा पदक’ (पीव्हीएसएम), २ ‘सेना पदक’ (शौर्य) ,२ ‘सेना पदक’ (विशिष्ट सेवा) आणि ७ ‘विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहेत.

तीन सेनाधिकाऱ्यांना परम विशिष्ट सेवा पदक’

लष्कराच्या सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर आणि लेफ्टनंट जनरल मनोज  पांडे या लष्काराच्या दोन सेनाधिकाऱ्यांना तसेच नौदलाचे व्हाईस ॲडमिरल सतिशकुमार घोरमाडे यांना सर्वोच्च मानाचे परम विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.

दोन  सेना पदक (शौर्य)

१६-मराठा लाईट इन्फेन्ट्रीचे नायक निलेश मल्हारराव देशमुख आणि २४-मराठा लाईट इन्फेन्ट्रीचे शिपाई अण्णासाहेब निंगप्पा दुंडगे यांना ‘सेना पदक’ (शौर्य) जाहीर झाले आहे.

दोन सेना पदक (वि‍शिष्ट)

मराठा लाईट इन्फेन्ट्रीचे ब्रिगेडीयर पराग केशवराव नांगरे आणि ८-ग्रेनेडीयरचे कर्नल कौस्तुभ उल्हास केकरे  यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘सेना पदक’ (वि‍शिष्ट) जाहीर झाले आहे.

सात : विशिष्ट सेवा पदक

लष्कराच्या सिग्नल रेजिमेंटचे मेजर जनरल कुलभूषण हनुमंत गवास, लष्कराच्या पोस्ट सेवेचे मेजर जनरल वसंत महेश दामोदर,इंटेलिजन्स कॉर्प्सचे कर्नल किरण नारायण कुलकर्णी, लष्कर अभियांत्रिकीचे कर्नल अजय लोंढे आणि आर्मोरेड कॉर्प्सचे लेफ्टनंट कर्नल महेश विष्णु जाधव यांना ‘विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे.  तसेच, नौदलाचे कमोडोर विद्याधर हरके आणि कमांडर योगेश आठवले यांनाही ‘विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे.