काँग्रेसला पक्ष सांभाळता येत नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई,१३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज अधिकृतरित्या भाजपामध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचे कौतुक केले. तसेच काँग्रेसला त्यांचा पक्ष आणि नेत्यांना सांभाळता येत नाही. आज काँग्रेसमध्ये पार्टी कुठल्या दिशेने चालली आहे हे कळत नाही. देशातील मुख्य धारेत जायला पाहिजे असे मुख्य नेत्यांना वाटते म्हणून नेते आमच्याकडे येत आहेत. आम्ही टार्गेट घेऊन चालत नाही. पण जे नेते योग्य वाटतात त्यांच्याशी आमची चर्चा आहे. हे खरं आहे, काही नेते आमच्या संपर्कात आहेत. जमिनीशी जोडलेल्या नेत्याशी आमचा संपर्क सुरू आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. राज्यातले एक जेष्ठ नेतृत्व भाजपमध्ये प्रवेश करत आहे. ज्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणूक गाजवली. विविध मंत्रीपदे भूषवली, दोनवेळा जे राज्याचे मुख्यमंत्री झाले, ते अशोक चव्हाण आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अशोक चव्हाणांची मदत कुठे घ्यायची आम्हाला चांगलेच माहित असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्या अनुभवाचा आम्ही फायदा घेऊ, राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा आमचे केंद्र करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अशोक चव्हाण दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले. त्यांचा रोल काय असेल याबाबत केंद्र सरकारसोबत बोलून निर्णय घेतला जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.