शरद पवार गटाला मिळाले नवे नाव: ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ नावावर निवडणूक आयोगाचे शिक्कामोर्तब

अजित पवारांनी दाखल केली कॅव्हेट!

नवी दिल्ली,७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  केंद्रीय निवडणूक आयोगाने काल(६ फेब्रुवारी) अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याची मान्य दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला आज(७ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजेपर्यंत पक्षासाठी तीन नवीन चिन्ह आणि नावांचा प्रस्ताव देण्यास सांगितले होते. त्यानंतर शरद पवार गटाला कोणते नाव आणि चिन्ह मिळणार याची उत्सूकता राजकीय वर्तुळात लागून होती. शरद पवार गटाकडूनही तीन नावांचे पर्याय आयोगाला सादर करण्यात आले होते. त्यातील एका नावावर आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. हे नाव येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच राज्यसभेच्या निवडणुका पार पडेपर्यंतच वैध असेल, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या नावाने ओळखला जाणार शरद पवार गट-

शरद पवार गटाकडून नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी–शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार आणि नॅशॅलिस्ट काँग्रेस पार्टी–एस, असे तीन पर्याय आयोगाला सुचवण्यात आले होते. या तीन पर्यायांपैकी दुसरा पर्याय आयोगाने मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूक पार पडेपर्यंत शरद पवार गट ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार’ म्हणजे ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ या नावाने ओळखला जाणार आहे.

‘वटवृक्ष’ चिन्हासाठी आग्रही

येत्या काही दिवसात राज्यसभेच्या निवडणुका असून त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला नवीन नाव देण्यात आले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला आता या नवीन नावावर निवडणूक लढवता येणार आहे. तसेच, शरद पवार गट हा ‘वटवृक्ष’ या नव्या चिन्हासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. त्याबद्दलचा निर्णयही लवकरच लागण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार –

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिल्यानंतर या निकालाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमप्रतिनिधींशी बोलताना याबाबतची माहिती दिली.

कुठल्या निकषांच्या आधारावर निर्णय घेतला-

निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेल्या निकषांचे उल्लंघन करून हा निकाल दिल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच, जर दोन्ही गटांच्या नेत्यांचा नियुक्ती अवैध ठरते, तर मग आयोगाने कुठल्या निकषांच्या आधारावर अजित पवार गटाला पक्षनाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला? असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला.

काय असेल राष्ट्रवादीच्या राजकीय नाट्याचा पुढील अंक?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी झाल्या. शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतण्या एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. मात्र, अजित पवारांकडे बहुमत असल्याने निवडणूक आयोगाने निकाल अजितदादांच्या बाजूने दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळाचं चिन्ह अजितदादांना मिळाल्याने निवडणुका तोंडावर आल्या असताना शरद पवार गटाला प्रचंड मोठा धक्का बसला. हा निर्णय अमान्य असल्याने शरद पवार गटात सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे. मात्र, त्यापूर्वीच अजितदादांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत कॅव्हेट दाखल केली आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली जात आहे. मात्र यापूर्वीच अजित पवार गटाने मागणी केली आहे की विरोधी पक्षाकडून प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यापूर्वी बाजू मांडण्याची संधी अजित पवार गटाला मिळावी. अजित पवार गटाने कॅव्हेट दाखल करत सर्वोच्च न्यायालयात शरद पवारांकडून या प्रकरणात कुठलीही याचिका दाखल झाल्यास त्यावर एकतर्फा निर्णय घेतला जाऊ नये असे म्हटले आहे.

कॅव्हेट काय असते?

कॅव्हेट म्हणजे इशारा’ किंवा ‘सावधानपत्र’. एखाद्या व्यक्तीला त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या किंवा दाखल होणाऱ्या दाव्याची पूर्वसूचना देण्यात यावी, त्याशिवाय त्या व्यक्तीविरुद्ध न्यायालयाने कोणताही एकतर्फा हुकूम देऊ नये, याकरिता करण्यात आलेला अर्ज म्हणजे कॅव्हेट. ही न्यायालयाला देण्यात आलेली एक कायदेशीर नोटीस असते.