समृध्दी महामार्गालगत संरक्षक भिंत ; रस्त्यासाठी हडसपिंपळगाव येथील शेतकरी आक्रमक

वैजापूर,४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गालगत संपादित जमीन क्षेत्रावर कंत्राटदाराकडून संरक्षक भिंत बनविण्याचे हाती घेतलेल्या काम शेतक-यांनी बंद पाडले.आम्हाला शेतात येण्याजाण्यासाठी रास्ता उपलब्ध करुन द्या या भूमिकेवर तालुक्यातील करंजगाव, हडसपिंपळगाव  येथील शेतकरी आक्रमक झाले होते.

कंत्राटदाराकडून पोलीस बंदोबस्तात काम करण्याचा प्रयत्न शेतक-यांनी हाणून पाडल्यामुळे येत्या काळात समृद्धी महामार्गासाठी जमीन क्षेत्र संपादित झालेल्या शेतक-यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्त्याचा प्रश्न गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नागपूर ते शिर्डी पर्यत समृद्धी महामार्गावर वाहतूक सेवेचा शुभारंभ करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.नागपूर ते वैजापूर तालुक्यापर्यत समृद्धी महामार्गाचे सर्व कामे पूर्ण झाले असल्याची माहिती रस्ते विकास महामंडळातील सुत्रांनी दिली. शीघ्र गती संचार मार्ग असल्याने या महामार्गात चार चाकी वाहना व्यतिरिक्त इतर तीन चाकी, दुचाकी वाहनांना प्रवेश नाही. महामार्गाचे दोन्ही बाजुने संरक्षक कुंपण लावण्याचे काम कंत्राटदारा मार्फत सुरु केले आहे.त्या कामाला हडसपिंपळगाव येथील शेतक-यांनी कडाडून विरोधाची भुमिका घेतली होती. मोठया संख्येने शेतक-यांचा जमाव कुंपण बसवण्याचे काम सुरु असलेल्या ठिकाणी जमला होता.आम्हाला शेतात जाण्याचा मार्ग दिल्याशिवाय काम करु देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेऊन शेतक-यांनी काम बंद पाडले.