पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या “पृथ्वी विज्ञान(PRITHVI)” या व्यापक योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली ,५ जानेवारी  / प्रतिनिधी :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या “ पृथ्वी विज्ञान(PRITHVI)” या व्यापक  योजनेला मंजुरी दिली आहे. 2021-26 या कालावधीत एकंदर रु. 4797 कोटी रुपये  खर्चाने ही योजना राबवली जाणार आहे.  या योजनेमध्ये सध्या सुरू असलेल्या, वातावरण आणि हवामान संशोधन- मॉडेलिंग निरीक्षण प्रणाली आणि सेवा(ACROSS), महासागर सेवा, मॉडेलिंग उपयोजन, संसाधने आणि तंत्रज्ञान(O-SMART), ध्रुवीय विज्ञान आणि क्रायोस्फिअऱ संशोधन(PACER), भूकंपमापनशास्त्र आणि भूगर्भविज्ञान(SAGE), संशोधन, शिक्षण, प्रशिक्षण आणि संपर्क(REACHOUT) या पाच उप-योजनांचा प्रामुख्याने समावेश आहे.

या व्यापक  पृथ्वी या योजनेची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेतः

  • पृथ्वी प्रणाली आणि बदलाच्या महत्त्वाच्या संकेतांची  नोंद करण्यासाठी  वातावरण, महासागर, जियोस्फिअर, क्रायोस्फिअर आणि घन पृथ्वी यांचे दीर्घकालीन निरीक्षणांमध्ये वाढ आणि शाश्वतता.
  • हवामान, महासागर आणि हवामानविषयक जोखमी यांचे आकलन आणि भाकित करण्यासाठी आणि हवामान बदलाचे विज्ञान समजून घेण्यासाठी मॉडेलिंग प्रणालीचा विकास करणे.
  • पृथ्वीच्या ध्रुवीय आणि मुक्त महासागरी प्रदेशाचे नवीन घटना आणि संसाधनाकरिता उत्खनन
  • सामाजिक उपयोजनांसाठी महासागरी संसाधनांचे उत्खनन आणि शाश्वत वापरासाठी तंत्रज्ञानाचा विकास करणे
  • सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक फायद्यांसाठी ज्ञानाचा सेवांमध्ये वापर करणे.

हवामान, वातावरण, महासागर आणि किनारी परिस्थिती , जलविज्ञान , भूकंपविज्ञान आणि नैसर्गिक आपत्तींसंदर्भात  सेवा पुरवण्यासाठी, सागरी सजीव आणि निर्जिव संसाधनांचा शाश्वत पद्धतीने शोध घेण्यासाठी आणि जोपासना करण्यासाठी आणि पृथ्वीच्या तिन्ही ध्रुवांचे( आर्क्टिक, अंटार्क्टिक आणि हिमालय) उत्खनन करण्यासाठी समाजाकरिता विज्ञानाचा वापर करण्याचे काम पृथ्वी विज्ञान मंत्रालय ( MoES ) करत आहे. या सेवांमध्ये हवामानाचा अंदाज( जमीन आणि महासागर या दोन्ही ठिकाणी) आणि कटीबंधीय चक्रीवादळे, वादळे, पूर, उष्णतेच्या लाटा, ढगांचा कडक़डाट, वीज पडणे, भूकंपावर देखरेख आणि त्सुनामीचा इशारा यांचा समावेश आहे. मंत्रालयाकडून दिल्या जाणाऱ्या सेवांचा विविध संस्था आणि राज्य सरकारांकडून मानवी जिवांचे रक्षण करण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्तींमुळे मालमत्तेची हानी कमी करण्यासाठी वापर केला जात आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे संशोधन आणि परिचालन(सेवा) कार्य दहा संस्थांकडून चालवले जाते. भारतीय हवामानशास्त्र विभाग, मध्यम अवधी  हवामान भाकिताचे राष्ट्रीय केंद्र, सागरी जैवसंपदा आणि पर्यावरणशास्त्र केंद्र, राष्ट्रीय किनारपट्टी संशोधन केंद्र,  राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र, राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था, राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र, हैदराबाद, राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र, गोवा, भारतीय कटीबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे आणि राष्ट्रीय भूविज्ञान अभ्यास संस्था या संस्थांचा यात समावेश आहे. महासागरशास्त्र आणि किनारपट्टी संशोधन करणाऱ्या जहाजांच्या ताफ्याच्या मदतीने मंत्रालय आवश्यक असलेले संशोधनविषयक पाठबळ देत असते.

पृथ्वी प्रणाली विज्ञान पृथ्वी प्रणालीमधील वातावरण, हायड्रोस्फिअर, जिओस्फिअर, क्रायोस्फिअर आणि बायोस्फिअर आणि त्यांच्यातील गुंतागुंतीचे संपर्क या सर्व पाचही घटकांची हाताळणी करते.  पृथ्वी विज्ञान मंत्रालय पृथ्वी प्रणाली विज्ञानाशी संबंधित सर्व पैलूंवर समग्रपणे लक्ष केंद्रित करते. पृथ्वी ही अतिशय महत्त्वाची योजना पृथ्वी प्रणाली विज्ञानाचे आकलन करण्यासाठी आणि देशासाठी विश्वासार्ह सेवा प्रदान करण्यासाठी पृथ्वी प्रणालीच्या सर्व पाच घटकांवर समग्रपणे लक्ष देईल. या योजनेचे विविध घटक परस्परांवर अवलंबून आहेत आणि मंत्रालयांतर्गत असलेल्या संबंधित संस्थांकडून एकत्रित प्रयत्नांद्वारे त्यांचा एकात्मिक परिणाम साध्य केला जातो. पृथ्वी विज्ञानाच्या या महत्त्वाच्या योजनेमुळे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या विविध  संस्थांमध्ये एकात्मिक बहु-शाखीय पृथ्वी विज्ञान संशोधन आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रम विकसित करणे शक्य होईल. या एकात्मिक संशोधन आणि विकास प्रयत्नांमुळे हवामान आणि हवामान, महासागर, क्रायोस्फीअर, भूकंप विज्ञान आणि सेवा या मोठ्या आव्हानांचा सामना करण्यास आणि त्यांच्या शाश्वत वापरासाठी सजीव आणि निर्जीव संसाधनांचा शोध घेण्यास मदत होईल.