छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुलात ​ होणार ‘नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव’ १२ जानेवारीपासून

महोत्सवाच्या निमित्ताने भरणार मिनी ऑलम्पिकचा मेळा

छत्रपती संभाजीनगर,५ जानेवारी / प्रतिनिधी :-स्वामी विवेकानंद यांची जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर क्रीडा मंच व छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल येथे ‘नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या क्रीडा महोत्सवात ५१ खेळांचा समावेश करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत या नमो चषकाचे मुख्य आयोजक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिली. यावेळी गृहनिर्माण व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, छत्रपती संभाजीनगर क्रीडा मंचाचे डॉ. दत्ताभाऊ पात्रीकर, सचिन मुळे, अजित मुळे, मनीष धूत ,छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, उपाध्यक्ष डॉ. उदय डोंगरे, सचिव गोविंद शर्मा उपस्थित होते.

स्वामी विवेकानंदांची भाषणे, त्यांची शिकवण तरुणांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहेत. आपल्या देशाती प्रतिभावान तरुणांना राष्ट्र उभारणीसाठी प्रेरित करण्यासाठी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा व देशासाठी नवतरुण युवा उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावेत या हेतूने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन देशभर होत आहे. हा केवळ महोत्सव नसून शहरात मिनी ऑलिम्पिकचा मेळा असणार आहे. कारण नॅशनल गेम्स नंतर राज्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने एका छताखाली ५१ खेळांच्या स्पर्धा घेण्यात येत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव घेण्यात येत आहे. अन्यत्र १० ते १५ खेळांच्याच स्पर्धा नमो चषक मधे घेण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरात ऑलिम्पिक संघटनेने सर्वच खेळांच्या स्पर्धा घेण्यात यावा असा आग्रह नमो चषकचे मुख्य आयोजक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या कडे धरल्याने ऑलिम्पिक संघटनेच्या सहकार्याने पहिल्यांदाच या महोत्सवाच्या माध्यमातून ५१ क्रीडा स्पर्धा एकाच वेळी घेण्यात येत आहे. स्विमिंग वगळता सर्व स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल येथील इनडोअर आणि आऊटडोअर परिसरात १२ ते १७ जानेवारी दरम्यान होणार आहे. तसेच कन्नड, वैजापूर, गंगापुर येथे ही नमो चषकचे आयोजन करण्यात येत आहे.
—–
या स्पर्धांचा असणार समावेश

छत्रपती संभाजीनगर क्रीडा मंच व छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिकअसोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित नमो चषक क्रीडा महोत्सव ऑलिम्पिक असोसिएशनच्या तांत्रिक सहकार्याने व ५१ विविध खेळांच्या क्रीडा संघटनेच्या मान्यतेने व सहकार्याने पार पडणार आहे. महोत्सवात प्रामुख्याने खो-खो, बॅडमिंटन, ॲथलेटिक्स, बास्केटबॉल, फुटबॉल, सायकलिंग, पॅरा ॲथलेटिक्स, पॅरा स्विमिंग, जिम्नॅस्टिक, तायक्वांदो,  टेबल टेनिस, बुद्धिबळ, ज्यूडो, योगासना, बॉडी बिल्डिंग, कराटे, कबड्डी, स्विमिंग, तलवारबाजी, लॉन टेनिस, स्विमिंग, रायफल शूटिंग, बॉक्सिंग, हॉकी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्केटिंग, जम्प रोप, हँडबॉल, गोल्फ, डॉजबॉल, टेनिस बॉल क्रिकेट, किक-बॉक्सिंग, सॉफ्टबॉल, रस्सीखेच, वूशु, ड्रॉप रोल बॉल, तेनिकोईत, ट्रायथलॉन, बेसबॉल, रग्बी, मल्लखांब, रोप मल्लखांब, आर्चरी, कॅरम, शूटिंग वॉलीबॉल, थ्रो बॉल, गदा युद्ध आणि एरोबिक्स जिमनॅस्टिक या स्पर्धा घेण्यात येणार आहे.
——
खेळाडूंना करता येणार बक्षिसांची लयलूट

सहभागी होणाऱ्या खेळाडूंना स्पर्धेमध्ये वैयक्तिक गटात प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या खेळाडूंना मेडल, प्रमाणपत्र व आकर्षित बक्षीस देण्यात येणार आहे. तर सांघिक गटामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या सर्व संघास चषक, मेडल व प्रमाणपत्र तसेच आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. व्यक्तिगत गटामध्ये एकूण २ हजार २३० गोल्ड मेडल, २ हजार २३० सिल्वर मेडल, २ हजार ५९० ब्राँझ मेडल तर सांघिक गटामध्ये प्रथम येणाऱ्यांना १२२ चषक, द्वितीय येणाऱ्यांना १२२ चषक आणि तृतीय स्थान पटकावणाऱ्यांना संघाना १०९ चषक या स्पर्धेमध्ये प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये विविध ५१ खेळांचे २५ हजारावरून अधिक खेळाडू जिल्हाभरातून सहभागी होणार आहेत.
—–
राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळाडू असणार आयकॉन

नमो चषक स्पर्धेमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ५१ खेळांसाठी ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने प्रत्येक खेळासाठी संबंधित खेळाच्या संघटनेकडून १ कॉर्डिनेटरची नेमणूक करण्यात आलेली आहे. नोंदणी, स्पर्धेचे तांत्रिक नियोजन, निकाल तसेच खेळाडूंना इतर माहिती या कॉर्डिनेटरकडून खेळाडूंना मिळेल. तर या सर्व ५१ खेळांमध्ये प्रत्येकी एक राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळाडूला आयकॉन खेळाडू म्हणून या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी २ हजाराहून अधिक पंच, ५०० स्वयंसेवक, शंभरहून अधिक डॉक्टर्स व विविध स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी काम पाहणार आहेत.

महोत्सवासाठी डॉ. भागवत कराड यांचा भक्कम पाठिंबा

मराठवाडयातील खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविलेला आहे. त्यामुळे मराठवाडयातच राज्य क्रीडा विद्यापीठावर हक्क असून छत्रपती संभाजीनगरात राज्य क्रीडा विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे, अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांची होती. त्यांच्याच विशेष प्रयत्नानंतर छत्रपती संभाजीनगरात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येत आहे. ‘साई’मध्ये खेळाडूंना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा त्यांनी करुन तत्कालीन क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्या माध्यमातून ४९ कोटी साई केंद्रला मिळून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ११ कोटी ७५ लाख रुपये खर्चुन मराठवाड्यातील पहिले अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात येत आहे. १० लेनच्या ४०० मी लांबीच्या सिंथेटिक ट्रॅकची निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारच्या ’खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत सात कोटींचा निधी डॉ.कराड यांच्या सहकार्याने प्राप्त झाला आहे. डॉ. भागवत कराड यांनी खेळाडूंसाठी वेळोवेळी मदतीचा हात दिलेला आहे. या महोत्सवाच्या आयोजनासाठी सुद्धा डॉ. कराड यांनी पुढाकार येऊन आयोजनासाठी भक्कम पाठींबा दिलेला आहे. त्यांच्यामुळेच या महोत्सव आयोजन करणे शक्य झाल्याचे ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी सांगितले.
………….

– या सर्व 51 खेळांचे स्पर्धा छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक असोसिएशनच्या तांत्रिक सहकार्याने व 51 विविध खेळांच्या  क्रीडा संघटनेच्या मान्यतेने व सहकार्याने पार पडणार आहे

– या नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक मोहत्सवामध्ये विविध 51 खेळांचे १ लाखहून अधिक खेळाडू जिल्हाभरातून सहभागी होणार आहेत

– या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी २ हजाराहून अधिक पंच, ५ हजार स्वयंसेवक, १०० हून अधिक डॉक्टर्स व विविध स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी काम पाहणार आहेत.

–या नमो चषक स्पर्धेमध्ये आयोजित करण्यात येणारा 51 खेळांसाठी ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने प्रत्येक खेळासाठी संबंधित खेळाच्या संघटनेच कडून 1 कॉर्डिनेटरची नेमणूक करण्यात आलेली आहे. नोंदणी, स्पर्धेचे तांत्रिक नियोजन, निकाल तसेच खेळाडूंना इतर माहिती या कॉर्डिनेटरकडून खेळाडूंना मिळेल.

-सर्व स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल मधे आयोजित होणार आहेत.(स्विमिंग सोडून)

– या पत्रकार परिषदेला भाजपा नेते संजय केणेकर, सुहास दाशरथे , रामेश्वर भाडवे, हर्षवर्धन कराड, राजू शिंदे, शिवाजी दांडगे, राज वानखेडे आदि उपस्थित होते.