मुंबईत २० जानेवारीपासून आमरण उपोषण-मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची घोषणा

जरांगे २० जानेवारीपासून आझाद मैदानात उपोषण करणार

बीड ,२३ डिसेंबर /प्रतिनिधी :-राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा ‘येवल्याचा येडपट’ असा उल्लेख करीत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी बीडमधील इशारा सभेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी 20 जानेवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार असल्याचीही घोषणा केली.

हे सरकार झोपेचं सोंग घेत आहे. मराठा समाजाचा अपमान करत आहे. मराठा समाजाची फसवणूक करत आहे. मराठा समाजाच्या जीवावर सत्ता मिळवतात आणि सत्ता मिळाल्यावर छगन भुजबळ यांच्या सारख्यांना त्याचा लाभ दिला जात आहे. आपल्या पोरांनी काही न करताही गुन्हे लावले गेले. निष्पाप पोरांना गुतवण्याचं काम सरकारनं केलं आहे, अशी टीका जरांगे यांनी केली. भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी, ‘एवढी गर्दी पाहून येवल्याच्या यडपटाला XXXXXXX लागल्याशिवाय राहणार नाही’ असे म्हणत भुजबळांना लक्ष्य केले.

आता देव जरी आडवा आला तरी …

सरकारने आम्हाला अडवू नये, आमरण उपोषणाशिवाय कोणताही शांततेचा मार्ग असूच शकत नाही. आता देव जरी आडवा आला तरी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार, सरकार मराठा आरक्षण कसं देत नाही ते पाहू, अशी गर्जनाही त्यांनी केली.

आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही-

सरकारला खूप वेळ दिला. मुंबईत जाताना कुणी हिंसा करु नये. ३ कोटी मराठे मुंबईत येणार आहेत. कोणी दंगा करायला लागला तर तो आपला नाही, जो हिंसा करेन तो आपला नाही. फक्त मराठा समाजाला डाग लागला नाही पाहिजे, एवढी काळजी घ्यावी, मुंबईला जाण्याची जोरदार तयारी करा, असे आवाहन करतानाच आमच्या लेकरांचे मुडदे आम्ही बघू शकत नाही. शांततेच्या आंदोलनात प्रचंड ताकद आहे. शांततेत पण मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे घेणार नाही., असेही जरांगे म्हणाले. छगन भुजबळ यांचेच सरकार ऐकत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. भुजबळ मराठ्यांच्या वाट्याला कशाला जातात, असा सवाल करताना ‘मी लई नमुना बेक्कार’ असल्याचे ते म्हणाले.

…तर तुमचा सुपडा साफ झाला म्हणून समजा-

मराठा समाजाला आता डिवचू नका, तुम्ही आंतरवाली सराटीत प्रयोग केला. पुन्हा तसा प्रयोग करू नका, आता सावध रहा, कानाकोपऱ्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे भुजबळचे ऐकून तुम्ही मराठ्यांवर अन्याय केला तर जड जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा समाजाचे आमदार, खासदार आणि मंत्री यांना विनंती आहे. मराठा समाजाच्या लेकरांच्या पाठीशी उभे रहा. जर पाठीशी उभे नाही राहिलात तर मराठ्यांचे घर तुम्हाला कायमस्वरूपी बंद राहिल, जो कोणी मराठ्यांच्या पाठिशी उभा राहिल तोच नेता आमचा, मराठ्यांच्या नादाला लागला की संपला, त्याचा विषयच आवरला. जे आपल्या लेकरांच्या बाजूने आहे, तोच नेता आपला बाकी कोणीच आपला नाही. आपलं मत घेण्यासाठी दारात आला तर त्याला चपलेने तुडवा, कारण आरक्षणासाठी किती तरी बळी गेले आहेत, आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण पाहिजे, यासाठी ही आमची लढाई आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे, आमच्या सर्वांची वेदना एकच आहे. मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही. सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, भुजबळांचे ऐकू नका, एकदा जर संपूर्ण समाज खवळला तर मग तुमचा सुपडा साफ झाला म्हणून समजा, असे जरांगे-पाटील म्हणाले.