९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

संमेलनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे येण्याचे आश्वासन

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले असून संमेलनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी येण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे देखील समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली.

९७ वे मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे.  संमेलनाचे स्वागताध्यक्ष गिरीश महाजन यांनी आज अमळनेर येथे जावून साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संमेलनाच्या विविध ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी केली. आतापर्यंत झाले नाही असे संमेलन करून दाखायचं आहे, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रताप महाविद्यालय,अमळनेर येथे झालेल्या बैठकीत बोलताना महाजन म्हणाले की,  संमेलनाचा मी स्वागताध्यक्ष आहे. या संमेलनात कुठलीही कमी राहता कामा नाही, याची आपण दक्षता घेवू. आतापर्यंत झाले नाही असे संमेलन करून दाखायचं आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सर्वजण आपल्या सोबत आहेत, कोणीही काळजी करु नये. तुम्ही सर्वजण कामाला लागा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना दिले. संमेलनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले असून मुख्यमंत्री व दोन्ही, उपमुख्यमंत्र्यांनी येण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले यावेळी त्यांनी बैठकीतून थेट गडकरी यांना फोन लावून चर्चा केली. चर्चेनंतर गडकरी यांनी येण्याचे आश्वासन दिले असल्याने त्यांनी सांगितले.

या बैठकीला माजी आमदार शिरीष चौधरी, मराठी वाङ्‌मय मंडळ अमळनेरचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारी सदस्य प्रा. डॉ. पी बी भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शीला पाटील, अजय केले, बजरंग अग्रवाल यांच्यासह खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र  देशमुख, माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्यउपाध्यक्ष प्रदिप अग्रवाल, सदस्य हरी वाणी, डॉ. संदेश गुजराथी, कल्याण पाटील, विनोद पाटील, निरज अग्रवाल, योगेश मुंदडे, चिटणिस प्रा. डॉ.ए.बी. जैन, सहचिटणिस प्रा. डॉ. डी. आर. वैष्णव, प्रा. आर. एम. पारधी, विनोद मधुकर पाटील तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व श्री.गायकवाड उपस्थित होते.

मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाचे सर्वोतोपरी सहकार्य -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अखिल भारतीय  मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य शासनातर्फे सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. संमेलनाचे समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक व साहित्य महामंडळाच्या कार्यवाह प्रा.डॉ.उज्ज्वला मेहेंदळे यांनी फडणवीस यांना भेटून साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले. यावेळी फडणवीस यांनी संमेलनाच्या तयारीची सविस्तर माहिती घेत कामाबद्दल समाधान व्यक्त केले. संमेलनासाठी उपस्थित राहण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.

अ.भा.मराठी साहित्य संमेलन तब्बल ७२ वर्षांनतर अमळनेर येथे होत आहे. यामुळे संमेलनाची जय्यत तयारी सुरु आहे. संमेलनाचा उत्साह केवळ अमळनेरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत असल्याचे डॉ.पाठक यांनी ना.फडणवीस यांना सांगितले. जळगाव जिल्हा व एकंदरीत संपूर्ण खान्देशला साहित्य क्षेत्राची मोठी परंपरा राहिली आहे. यामुळे हे संमलन निश्चितपणे यशस्वी होईलच, असा विश्वास ना.फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी साहित्य संमेलन व महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रावर सविस्तर चर्चा झाली.