मराठा आरक्षण प्रश्नी उपोषण करण्याची वेळ येणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,२३ डिसेंबर / प्रतिनिधी :-मराठा आरक्षणासंबंधी काम अंतिम टप्प्यात आहे. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पेटिशन दाखल करण्यात आल्याने आता यावर लवकरच मोठा निर्णय होईल. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे-पाटील यांना आमरण उपोषण करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आरक्षणप्रश्नी मराठा समाजाला लवकरच न्याय मिळणार आहे. या प्रश्नी दाखल क्युरेटिव्ह पिटीशनवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी होणार आहे. आताच सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालाय, क्युरेटिव्ह पिटीशन २४ जानेवारीला कोर्ट ऐकणार आहे. ही याचिका फेटाळेल असं म्हटलं जायचं. पण सुप्रीम कोर्ट हे ऐकणार आहे, त्यामुळे मराठा समाजासाठी मोठा दिलासा आहे. २४ जानेवारीला वकिलांची तज्ज्ञ फौज बाजू मांडेल, मराठा समाज मागास कसा आहे हे सांगेल, परिस्थिती सांगेल. सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी मांडल्या होत्या, त्या दूर कऱण्याचं काम वकिलांची फौज करेल. मला वाटतं मराठा सामाजाला न्याय मिळेल असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मागच्या सरकारने मविआ सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी जे पुरावे द्यायला हवे होते ते मांडले नव्हते. पण यावेळी निष्णात वकिलांची फौज बाजू मांडेल. तोपर्यंत सर्वांनी शांतता राखणे आवश्यक आहे. कायदा सुव्यवस्थता, शांतता राहिली पाहिजे, सर्व जाती धर्मांना माझं आवाहन आहे, सर्वांनी संयम राखावा, मराठा समाजाला नक्की न्याय मिळेल. क्युरेटिव्ह पीटिशन ऐकली जाणं ही जमेची बाब आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सर्वांची इच्छा आहे, सत्ताधारी, विरोधक, आंदोलक सर्वांना वाटतं मराठा आरक्षण मिळावं ही सर्वांची इच्छा आहे. सुप्रीम कोर्टात आम्ही बाजू मांडू, सर्वांनी शांतता राखावी, असं मुख्यमंत्री म्हणाले.