मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली, २४ जानेवारीला सुनावणी 

छत्रपती संभाजीनगर,२३ डिसेंबर / प्रतिनिधी :-मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमला अवघे काही तास शिल्लक असताना मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मोठा दावा केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून येत्या 24 जानेवारीला याबाबत निकाल देण्यात येईल, असा दावा विनोद पाटील यांनी आज केला.

मराठा आरक्षण निर्णयाचा फेरविचार व्हावा आणि पुन्हा एकदा बाजू ऐकून घेतली जावी म्हणून महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतल्याचा दावा विनोद पाटील यांनी केल्यामुळे राज्य सरकारसोबतच मराठा समाजासाठी आरक्षणाच्या बाबतीत हा मोठा दिलासा मानला जात आहे.

” सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांनी मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली आहे. येत्या 24 जानेवारीला या संदर्भात निकाल देण्यात येईल असे आज न्यायालयाने स्पष्ट केले. 12 वाजून 23 मिनिटाला याबाबत माननीय न्यायमूर्तींनी सही करून त्या संदर्भात आदेश दिला आहे. मला विश्वास आहे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार”, असे पाटील यांनी सांगितले.

“क्युरेटिव्ह पिटीशन संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलं. येत्या 24 जानेवारी रोजी परत एकदा सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी क्युरेटिव्ह पिटीशन ठेवली आहे. याचा अर्थ कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन नाकारली नसून ती स्वीकारली आहे. त्यामुळे लवकरात लवकर याच्यावर सुनावणी होईल आणि मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल, असा मला विश्वास आहे”, असेही पाटील यावेळी म्हणाले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.