जालना जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 205-जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे

फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद, जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद

जालना, दि. 8 – कोव्हीड-19 च्या या आव्हानात्मक काळात शासन, प्रशासन, विविध सेवाभावी संस्था, जिल्हा आरोग्य, पोलीस तसेच प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येकजण एकत्रित येऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या मतना असलेल्या प्रश्नांचे निराकरण व्हावे यादृष्टीने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनीही सहभाग नोंदवला.

जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, लॉकडाऊन जाहिर झाल्यापासुन जनतेने शासन व प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे अत्यंत शिस्तबद्ध रितीने पालन केले. एप्रिलअखेरपर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या केवळ तीन एवढी होती. परंतू लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्याने तसेच परराज्य व परजिल्ह्यातुन जालना जिल्ह्यात दाखल झालेल्या व्यक्तींमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यात आजघडीला कोरोनाबाधितांची संख्या 205 एवढी असली तरी त्यातील 114 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असुन आजघडीला जिल्ह्यात 86 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. उपचार सुरु असलेल्या रुग्णांची प्रृकतीही स्थिर आहे.

कोरोना विषाणुला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असुन याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नांच्या निराकरणासाठी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधण्यात येत असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, पूर्वी जिल्हा रुग्णालयात केवळ २ व्हेटीलेटर्स होते. परंतू राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यासाठी अत्यंत चांगल्या दर्जाचे 35 व्हेंटीलेटर्स मिळविण्यात यश आले. कोरोनाबाधित झालेल्या झालेल्या रुग्णांना आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देता याव्यात यासाठी केवळ 29 दिवसांमध्ये डेडीकेटेड कोव्हीड रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. या रुगणालयात एकुण 200 खाटा असुन यापैकी 40 खाटा या आयसीयु आहेत. या रुग्णालयात नवीन डॉक्टर्स, नर्सेस व आवश्यक स्टाफ उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या सर्व 200 खाटांना ऑक्सीजनची सुविधा पुरविण्याबरोबरच आवश्यक तो औषधीसाठा पुरविण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी दिली.

जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय, विवेकानंद हॉस्पीटल व डेडीकेट कोव्हीड हॉस्पीटल येथे कोव्हीड रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. कोव्हीडसाठी काम करणाऱ्या रुग्णालयामध्ये 47 डॉक्टर व 129 पॅरामेडीकल स्टाफ असे एकुण 176 व्यक्तींची भरती केलेली आहे. जालना जिल्ह्यात आयएमए (Indian Medical Association) यांचेसुद्धा योगदान यामध्ये मोठे आहे. जिल्ह्यातील नामांकित असलेल्या खासगी दवाखान्यातील डॉक्टर्स हेसुद्धा नियमितपणे कोव्हीड रुग्णांवर उपचार करत आहेत. पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन जालना जिल्ह्यासाठी आरटीपीसीआर लॅब मंजुर करण्यात आली आहे. आरटीपीसीआर लॅब लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असुन या लॅबमुळे रुग्णांचे अहवाल जलदगतीने मिळुन रुग्णांवर उपचार करणे सोईचे होणार आहे. तसेच टी.बी रुग्णांसाठी सीबीनॅट मशिनही मंजूर झाली असुन रक्तपेढीचेही अद्यावतीकरण करुन घेण्यात आले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिली.

जालना जिल्ह्यात ज्या भागात कोरोनाबाधित आढळुन आले तो भाग कंन्टेन्टमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. जिल्ह्यात एकुण 64 कंन्टेन्टमेंट झोन होते. त्यापैकी 31 झोनचा कालावधी संपल्याने ते बंद करण्यात आले असुन आजघडीला 33 झोन कार्यान्वित आहेत. कंन्टेन्टमेंट झोनमधुन कोणीही अनावश्यक बाहेर पडू नये. सर्दी, खोकला, तापीचे लक्षण आढळल्यास तातडीने तपासणी करुन घ्या. तसेच परराज्य, परजिल्ह्यातुन आपल्या गावात कोणी आले असल्यास त्याची माहिती जिल्हा प्रशासनास देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी केले.

जनतेच्या तक्रारीची नोंद घेण्यासाठी प्रशिक्षित अधिकाऱ्यांचा समावेश असलेला नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात डॉक्टर, अशावर्कर,अंगणवाडी सेविका, एनजीओ यांच्या मदतीने ज्यांना सर्दी, ताप, खोकला आहे अशा व्यक्तींचे जिल्हाभर सर्वेक्षण करण्यात आले. कोव्हीड योद्धांनासुद्धा प्रशिक्षण देण्यात आले आहे. आजपर्यंत 55 हजार व्यक्तींना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या काळात जालन्यात अडकुन पडलेल्या व्यक्तींना स्वयंसेवी संस्था व जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने एकुण 3 हजार 104 व्यक्तींच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करण्यात आली. 46 हजार अन्न पाकीटे एनजीओच्या मदतीने उपलब्ध करुन दिली. परराज्यातील व्यक्तींना बस तसेच रेल्वेची विशेष व्यवस्था करुन त्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिली.

जालना जिल्ह्यातुन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनामार्फत योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना जरी करण्यात येत असल्या तरी जिल्ह्यातील नागरिकांनीही जिल्हा प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करावे. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. सामाजिक अंतराचे पालन, सॅनिटायजरचा वापर, मास्कचा वापर करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी केले. महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना येथील कोव्हीड हॉस्पीटल, शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार आपल्या सर्वांच्या सेवेसाठी दिवसरात्र वैद्यकीय सेवा देत आहेत. आपल्या सर्वांच्या सेवेत अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु वैद्यकीय सेवा देणाऱ्या या सर्व कोव्हीड योद्धयांना काही समाजकंटक जाणुनबुजुन मानसिक त्रास देत आहेत. भाड्याने राहत असलेले घर खाली करायला लावणे, सोसायटीमध्ये ये-जा करतेवेळी संशयित नजरेने पहाणे अशा बाबी होत असुन या कोव्हीड योद्धयांना मानसिक त्रास होईल अशा प्रकारची कुठलीही गोष्ट होता कामा नये. या कोव्हीड योद्धयांचा आत्मविश्वास वाढविणे ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी प्रत्येकोने या योद्धयांचा आत्मविश्वास वाढविण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी केले. फेसबुक लाईव्हद्वारे जनतेने विचारलेल्या प्रश्नांची तसेच त्यांच्या शंकांचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी उत्तरे देऊन समाधान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *