विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडच्या रुग्णालयाला भेट ; रुग्णांच्या नातेवाईकांनी फोडला टाहो

छत्रपती संभाजीनगर,४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- राज्यात नांदेडमध्ये २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील रुग्णायातील भीषण वास्तव समोर आलं आहे. या घटनेवरुन राज्यभर वातावरण तापलं असून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकाला चांगलचं धारेवर धरलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज नांदेड येथील शासकीय रुग्णालयात जाऊन पाहणी केली. तसंच रुग्णालयात उपचार करणाऱ्या रुग्णांच्या आमि मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी विरोधी पक्षनेत्यांसमोरच टाहो फोडल्याचं पाहायला मिळालं.

या प्रकरणावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, नांदेड शासकीय रुग्णालयातील घटना हृदय पिळून टाकणारी आहे. कुटुंबीय धाय मोकलून रडत होते. नवजात बालकांचा काय दोष? माणूसकी असलेला कोणताही व्यक्ती संवेदनशीलतेने हे पाहू शकत नाही. जे कुटुंब उद्धवस्त झालं त्यांना सरकारने आतातरी माणूसकी दाखवत प्रत्येकी १० लाखांनी आर्थिक मदत तातडीने द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांना देखील लक्ष्य केलं. ते म्हणाले की, भाजप चाणक्यला आमदारा पुरवायला, गोळा करायला फोडायला वेळ मिळतो. पण, इथे शासकीय रुग्णालयात आवश्यक यंत्रणा भरती करायला वेळ नाही, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. वडेट्टीवार यांनी रुग्णालयाला भेट दिल्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात रुग्णांचे नातेवाईक धाय मोकलून रडताना दिसून येत आहेत.


विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार नेमके काय म्हणाले 

मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी आमदारांची मर्जी संपादन करण्यासाठी ५००-५०० कोटीचा निधी आमदारांना दिला. त्यातील ५० कोटी आरोग्य व्यवस्थेला दिले असते तर आज शेकडो जीव वाचवले असते… रुग्णांच्या मृत्यूच्या बातम्या आल्या नसत्या.

घाटी रुग्णालयात 897 जागा रिक्त आहेत,2207 पैकी फक्त 1300 जागा भरल्या.सर्व जागा भरल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती.

नांदेडला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गेले नाही,मंत्री गेले ते पण नेहमीप्रमाणे खोटे बोलून मोकळे झाले.

यांच्याकडे आमदार खरेदी करायला खोके आहे. औषधी खरेदी करतांना निधी नसतो.

छत्रपती संभाजी नगर येथील घाटी शासकीय रुग्णालयातील स्थिती:

वर्ग एकच्या २८ पैकी १२ जागा रिक्त

वर्ग २ च्या २० जागा रिक्त

वर्ग ३ मध्ये ५६ जागा रिक्त

वर्ग ४ मधील ३१६ जागा रिक्त

एकूण

८९७ जागा या रुग्णालयात रिक्त आहेत

जीआर काढून सांगायचे

रुग्णांचे MRI, सिटी स्कॅन फ्री होईल.

घोषणा करायची, वाहवाह लुटायची आणि मोकळं व्हायचं.

तिकडे रुग्णालयात इन्स्ट्रुमेंट नाही, औषधसाठा नाही

सात महिन्यात सरकारने निधी का दिले नाही?

दिले असते तर शासकीय रुग्णालयात औषध तुटवडा झाला नसता.

उद्या राज्यपालांना भेटणार…

राज्यात विशेष अधिवेशन बोलवावे…राज्यातील बेजार बिमार झालेल्या आरोग्य यंत्रणेवर चर्चा करण्याची मागणी करणार .

आज शासकीय रुग्णालयात औषधी सापडत नाही, कोट्यवधी रुपयांचे नशा करणारे ड्रग्स सापडतात.

डॉक्टरांच्या जागा रिक्त आहे, ड्रग्स विकणारे तिथे आश्रय घेत आहे. पुण्यातील ससून रुग्णालय हे याचेच उदाहरण आहे. शासकीय रुग्णालय गुन्हेगारी अड्डा झाले आहे.