जालना मेडिकल कॉलेजसाठी पर्यायी जागेचा विचार करणार – आ. कैलास गोरंटयाल

जालना ,१७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-कन्हैय्यानगर परिसरात असलेल्या वन विभागाच्या जमिनीचा विषय अत्यंत गुंतागुंतीचा आणि अडचणीचा असल्याने जालन्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या मेडिकल कॉलेजसाठी पर्यायी जागेचा विचार केला जात असल्याची माहिती आ.कैलास गोरंटयाल यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
राज्य सरकारने जालना येथील मेडिकल कॉलेजला काही महिन्यांपूर्वीच मंजुरी दिली आहे.या कॉलेजसाठी सर्वप्रथम अंबड रोडवरील कुंबेफळ शिवारातील जमीन निश्चित करण्यात आली होती.या जागेबरोबरच राज्य सरकारच्या वतीने आलेल्या पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरपुडी,जालना शहरातील कन्हैय्यानगर परिसरातील वन विभागाच्या जमिनीची देखील पाहणी करून तसा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला होता.कुंबेफळ येथे उपलब्ध असलेल्या सरकारी जमिनीपैकी काही जमीन ही मेंटल हॉस्पिटलसाठी देण्यात आल्याने कन्हैय्यानगर परिसरात असलेल्या वन विभागाची जमीन मेडिकल कॉलेजसाठी निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र,वन विभागाने आणखी १४ एक्कर जागेवर दावा केला असल्याचे आ.कैलास गोरंटयाल यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

वन विभागाचे नियम,कायदे हे अधिक गुंतागुंतीचे आणि अडचणीचे असून ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे सदर जागे ऐवजी आता पर्यायी जागेचा विचार केला जाईल असे सांगून आ.गोरंटयाल म्हणाले की,जालन्यासह वर्धा येथील मंजूर असलेल्या मेडिकल कॉलेजसाठी अद्याप जागा उपलब्ध झालेली नाही.येत्या वर्षात मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा आपला प्रयत्न असून कुंबेफळ भागात मेंटल हॉस्पिटलसाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली असली तरी तेथे आणखी सरकारी जमीन उपलब्ध असल्याचे सांगून सदर जागेबाबत प्राधान्याने विचार केला जाईल.कुंबेफळ येथे उपलब्ध असलेली जमीन मेडिकल कॉलेजसाठी सर्व दृष्टीने योग्य राहील असे आ.कैलास गोरंटयाल यांनी यावेळी पत्रकारांनी उपस्थीत केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले.

या विषया संदर्भात आपली जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या सोबत बैठक असून या बैठकीत भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक,जालन्याचे उपअधीक्षक आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहणार असून त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्यानंतर जालन्यातील मेडिकल कॉलेजच्या कॉलेजच्या जागे संदर्भात ठोस निर्णय घेतला जाईल असे देखील आ.कैलास गोरंटयाल यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.यावेळी जालना शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमुद,तालुकाध्यक्ष वसंत जाधव,माजी नगरसेवक महावीर ढक्का,गणेश राऊत आदींची उपस्थिती होती.