नवीन आष्टी – अहमदनगर रेल्वे मार्ग दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा – मुख्यमंत्री शिंदे यांचा विश्वास

बीड, २३ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-नवीन आष्टी – अहमदनगर हा नवीन रेल्वेमार्ग बीड आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. राज्यातील पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील सर्वच प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येणार असून शहरी आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधण्यावर आपले सरकार भर देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

May be an image of 1 person, beard and sitting

अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या २६१ कि.मी. रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा असलेल्या नवीन आष्टी – अहमदनगर ६६ कि.मी. मार्गाचे उद्घाटन आणि डेमू सेवेचा प्रारंभ अशा दुहेरी कार्यक्रमात मुख्यमंत्री दूरदृष्य संवादप्रणालीद्वारे बोलत होते.

प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती होते. माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार सर्वश्री बाळासाहेब आजबे, लक्ष्मण पवार, सुरेश धस, आष्टीच्या नगराध्यक्षा श्रीमती पल्लवी धोंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांच्यासह रेल्वेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

दिवंगत गोपिनाथरावांनी पाहिलेले रेल्वे प्रकल्पाचे स्वप्न आज सत्यात आले आहे, याचे आपणास विशेष समाधान असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आज गोपिनाथराव हयात असते तर त्यांनी हा मार्ग बीड-नगरवासियांना अर्पण केला असता. राज्यातल्या अनेक विकास प्रकल्पांबाबत त्यांनी दूरदृष्टी दाखवली होती. त्यात या रेल्वे प्रकल्पाचाही समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रगती योजनेत अहमदनगर – बीड – परळी या २६१ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गाचा समावेश आहे. त्यासाठीच्या ५० टक्के खर्चाच्या तरतुदीची जबाबदारी शासनाने उचलली आहे, असे  स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, हा रेल्वे प्रकल्प केवळ दोन भूभाग आणि स्थानकांना जोडणारा नाही, तर माणसे, नातीगोती आणि हृदयांना जोडणारा आहे. या रेल्वेमुळे आता अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांना रोजच विकासाची धडधड जाणवणार आहे. विद्यमान शासनाच्या विकासाचा मार्ग वेगाचा राहणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी तोडगा काढण्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील हा बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकल्याबद्दल मध्य रेल्वेच्या  कर्मचारी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

दीर्घ संघर्षानंतर अहमदनगर-आष्टी रेल्वे धावत असल्याचा आपणास आनंद असल्याचे  सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिवंगत गोपिनाथराव मुंडे यांनी बीड येथे रेल्वेसेवा सुरू व्हावी, यासाठी सातत्याने पुढाकार घेतला होता. आज पहिल्या टप्प्यात न्यू आष्टी – अहमदनगर डेमू आणि रेल्वे मार्गाचे उद‌्घाटन झाले. हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले.

आपण मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाचा दर तीन महिन्याला आढावा घेत होतो. यासाठी आवश्यक तो भरीव निधी केंद्र व राज्य शासनाने दिला. राज्याचा भागीदारी हिस्सा सुरू करण्याचा निर्णयही या शासनाने घेतला, असे स्पष्ट करुन श्री. फडणवीस म्हणाले, येथील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार कृष्णा – मराठवाडा प्रकल्पास सुधारित मान्यता देऊन भरीव निधी दिला जाईल. शिवाय मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी समुद्रातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्यातील गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचा शासनाचा निर्धार आहे, असे सांगतानाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लातूर येथील रेल्वे कोच फॅक्टरीचे लवकरच लोकार्पण करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती सर्वांच्या साक्षीने आज होत असल्याचे सांगून रेल्वे मंत्री दानवे म्हणाले, मराठवाड्यातील बीडव्यतिरिक्त अन्य जिल्हे रेल्वेने जोडले गेले होते. पहिल्या टप्प्यातील रेल्वेने आज दिवंगत गोपिनाथराव मुंडे यांच्यासह सर्वांच्या मनातील स्वप्नपूर्तीची सुरवात होत आहे. या मुख्य प्रकल्पासाठी 96 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. यासाठी निधीची कमतरता पडू देणारं नाही. बीडपर्यंतचा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अहमदनगर – परळी रेल्वेच्या विद्युतीकरणास मंजुरी देण्यात आली असून, 2014 पासून रेल्वे कामांना गती मिळाली आहे. 400 वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येत असून त्यापैकी 120 गाड्या  लातूरच्या कारखान्यात तयार करण्यात येणार असल्याचे श्री. दानवे यांनी  यावेळी सांगितले.

बीड आणि अहमदनगर जिल्हा रेल्वेने जोडले जात असल्याचा आनंद व्यक्त करून राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सहकारी कारखानदारी सुरू ठेवण्यात बीड जिल्ह्याचे योगदान आहे. या रेल्वेमुळे बीड हा राज्यातील एक अग्रगण्य जिल्हा होईल. या रेल्वेला परळीपर्यंत नेण्याची जबाबदारी रेल्वे राज्य मंत्री दानवे यांची असल्याची अपेक्षा आहे. रेल्वेसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे व खा. प्रीतम मुंडे यांनी पाठपुरावा केल्याबद्दल तसेच पुरेसा निधी दिल्याबद्दल प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, रेल्वे राज्य मंत्री यांचे आभार मानले.

खा. प्रीतम मुंडे व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मनोगतात बीडवासियांची स्वप्नपूर्ती होत असल्याचा आनंद व्यक्त करून केंद्र व राज्य शासनाने भरीव निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

उपस्थित मान्यवरांनी यावेळी रेल्वे संघर्ष समितीतील लढा दिलेल्यांचे आभार मानले.  मान्यवरांच्या हस्ते कोनशीलेचे अनावरण करुन रेल्वे स्थानकाची पाहणी केली. मान्यवरांच्या हस्ते न्यू आष्टी अहमदनगर डेमू सेवेचा हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. रेल्वे मार्गाची माहिती देणारी लघुफित यावेळी दाखवण्यात आली.

माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, माजी आमदार भीमराव धोंडे, रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी प्रास्ताविक तर आमदार सुरेश धस यांनी आभार मानले.

नवीन आष्टी – अहमदनगर नवीन मार्गाविषयी…

  • 66किमी नवीन आष्टी-अहमदनगर ब्रॉडगेज लाईन हा अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या 261 कि.मी. नवीन ब्रॉडगेज लाईन प्रकल्पाचा एक भाग आहे ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात समसमान म्हणजे प्रत्येकी ५० टक्के खर्चाचा वाटा आहे.
  • डेमू (DEMU) सेवा नवीन आष्टी – अहमदनगर पट्ट्यातील रहिवाशांना आणि जवळपासच्या भागातील रहिवाशांना सुलभ ठरेल. यामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल आणि त्यामुळे मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक – आर्थिक विकासाला चालना मिळेल.
  • डेमू ट्रेन अहमदनगरहून सकाळी 07.45 वाजता सुटेल आणि न्यू आष्टीला सकाळी 10.30 वाजता पोहोचेल आणि परतीच्या प्रवासात न्यू आष्टी येथून सकाळी 11.00 वाजता सुटेल आणि दुपारी 1.55 वाजता अहमदनगर येथे पोहोचेल. ही गाडी रविवार वगळता आठवड्यात दररोज धावणार आहे.
  • कडा, नवीन धानोरा, सोलापूरवाडी, नवीन लोणी आणि नारायणडोहो येथे थांबेल.