लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड

विकसित भारतसंकल्प यात्रा

छत्रपती संभाजीनगर,९ डिसेंबर / प्रतिनिधी :-‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सध्या जिल्ह्यातील विविध गावांत नेण्यात येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक वंचित लाभार्थ्याला शासकीय योजनांचा लाभ मिळायला हवा. त्यासाठी ग्रामसेवकांसह सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात डॉ. कराड यांच्या अध्यक्षतेखाली आज विकसित भारत संकल्प यात्रेचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाणडेय, महानगरपालिका आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ.ओमप्रकाश रामावत, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर तसेच सर्व तहसिलदार आणि नगरपालिका मुख्याधिकारी ,ग्रामसेवक उपस्थित होते.     

      ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या अंतर्गत प्रत्येक गावामध्ये चित्ररथ, सेल्फी पॉईंट, चित्रफीत प्रसारण आणि माहितीपर साहित्य वितरण, लाभार्थ्यांची नोंदणी आणि लाभ देण्याबाबतची प्रक्रिया केली जात आहे. विशेषत: धरती कहे पुकार के, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना, अटल पेन्शन योजना, किसान क्रेडिट कार्ड, विश्वकर्मा योजना, उज्वला योजना,  नॅनो फर्टीलायझर,अटल पेन्शन योजना अशा योजनांच्या लाभासाठी लाभार्थ्यांची निवड, नोंदणी आणि प्रत्यक्ष लाभ देण्याबाबतची कार्यवाही करावी. त्याचा अहवाल यात्रेच्या पोर्टलवर अपलोड करावा, अशा सूचना डॉ. कराड यांनी दिल्या. यात्रेच्या दरम्यान राज्याचे आणि जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सुचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.  

शासनाच्या योजनांशी प्रत्येक व्यक्ती जोडला जावा- जिल्हाधिकारी पाण्डेय

  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले, ‘विकसित भारत संकल्प यात्रेत  एकही पात्र लाभार्थी   वंचित राहता कामा नये. आवास योजना व वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अर्ज भरून नोंदणी  करावी. व्यक्तीच्या विकासातून गाव, गावाच्या विकासातून जिल्हा आणि जिल्ह्याच्या विकासातून राज्य व राज्यांच्या विकासातून देश विकसित होईल. शासकीय योजनांशी प्रत्येक व्यक्ती जोडला जावा हाच उद्देश समोर ठेवून सर्व शासकीय यंत्रणेने सहभाग द्यावा. जिल्ह्याचा लक्षांकापेक्षा अधिक कामगिरी करावी असे निर्देश त्यांनी दिले. 

महापालिका क्षेत्रात वार्डनिहाय लाभार्थी नोंदणी- जी. श्रीकांत

 महानगरपालिका क्षेत्रामध्ये दोन चित्ररथाच्या माध्यमातून वॉर्डनिहाय शासकीय योजनांची माहिती आणि लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे नियोजन महानगरपालिका यांनी तयार केले असल्याचे बैठकीत महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले.

१८ हजार ७८४ लोकांना लाभ- डॉ. विकास मीना

डॉ. विकास मीना यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेच्या  माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी, लाभार्थ्यांची संख्या, योजनांची आरोग्य शिबिराच्या माध्यमातून विविध योजनांसाठी झालेली नोंदणी, स्थानिक विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रत्यक्ष योजनांमध्ये दिलेल्या लाभाची  जिल्ह्यातील कामगिरी विषयाचा अहवाल बैठकीमध्ये सादर केला. त्यांनी सांगितले की जिल्ह्यात आतापर्यंत सुरक्षा विमा योजनेत १५५८, जीवनज्योती विमा योजनेत १२२८, आरोग्य योजनांचे ३५५६, उज्ज्वला योजना २८९ आदी लाभ देण्यात आले. आतापर्यंत ही यात्रा  १४८ गावांमध्ये गेली असून त्यात १८ हजार ७८४ लोकांना लाभ मिळाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.