स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत तृतीय पंथीयांची नावे समाविष्ट करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करा – दिलीप शिंदे

मुंबई,३० जुलै /प्रतिनिधी :- स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत तृतीय पंथीयांची नावे  समाविष्ट करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करावेत,अशा सूचना राज्य सल्लागार (स्वीप) दिलीप शिंदे यांनी केल्या आहेत.

यासंदर्भात करावयाच्या उपाययोजनाबाबत विचार विनिमय करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर येथे बैठक घेण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी, मुंबई शहर राजीव निवतकर, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर मिलींद बोरीकर,उपजिल्हा निवडणूक अधिकारी उपनगर व शहर अनुक्रमे अजित साखरे,माधव पाटील,तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मतदानाच्या पवित्र हक्कापासून कोणीही पात्र मतदार वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोग व विभाग प्रयत्नशील तथा आग्रही आहे.त्यासाठी सर्वांनी जागरूकतेने प्रयत्न करावेत असे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी स्वीप कार्यक्रमाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

श्री.निवतकर,  व श्री. बोरीकर, यांनी तृतीयपंथीयांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी जिल्हयातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांना सूचित करण्यात आलेले असून मुंबई शहर जिल्हयातील 10 विधानसभा मतदार संघ कार्यालयाच्या ठिकाणी तर मुंबई उपनगर जिल्हयात 26 मतदार संघांच्या ठिकाणी सर्व माहिती व फॉर्म्स उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. याबाबत त्यांचेशी संपर्क साधण्यात यावा.तसेच तृतीयपंथीयांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणेबाबत तृतीयपंथी यांचे प्रतिनिधी यांनीही त्यांच्या स्तरावरुन प्रयत्न करावेत असेही आवाहन करण्यात आले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी द्वयांनी  मतदार यादीत तृतीय पंथीयांचा समावेश करणे सहज सुलभ व्हावे, यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्राची माहिती दिली. या बैठकीसाठी समाधान इंगळे, सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, मुंबई,संभाजी जाधव, कक्ष अधिकारी, मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय,स्वीप सदस्य  पल्लवी जाधव, साधना गोरे,

तसेच सलमा खान व इतर सदस्य, किन्नर ट्रस्ट,वर्षा विद्या विलास, सरचिटणीस, महाराष्ट्र नशाबंदी मंडळ, मुंबई आदी उपस्थित होते.