शिक्षण, रोजगारासाठी पाठबळ देऊन अल्पसंख्यांकाचा विकास करण्यास कटीबद्ध-अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार

सिल्लोड येथे गरजू लाभार्थ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचा प्रारंभ

सिल्लोड,९ डिसेंबर / प्रतिनिधी :-अल्पसंख्याक समाजाचा विकास करण्यासाठी त्यांना शिक्षणासाठी तसेच रोजगारासाठी पाठबळ देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या समाजातील होतकरु तरुण तरुणी, महिला, व्यापारी हे आर्थिकदृष्ट्या सबळ होऊन समाजाच्या मुख्यप्रवाहात येतील असे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याक विकास, औकाफ आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज सिल्लोड येथे केले.

अल्पसंख्याक विकास विभागाच्या मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्या. मुंबई यांच्या वतीने सिल्लोड येथे अल्पसंख्याक समाजातील गरजू लाभार्थ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले.

नॅशनल उर्दू हायस्कूल मैदान येथे आयोजित या कार्यशाळेस अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, उपसचिव मोईन ताशिलदार, अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे प्रबंध निदेशक डॉ. लालमिया शेख, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, देविदास पा. लोखंडे, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, सोयगाव नगराध्यक्ष श्रीमती आशाबी तडवी, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, तहसिलदार रमेश जसवंत, गटविकास अधिकारी दादाराव अहिरे, नॅशनल सूत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर, दामुअण्णा गव्हाणे, न.प.तील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे आदींची उपस्थिती होती.

श्री. सत्तार म्हणाले की, अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण , रोजगार या दोन महत्त्वाच्या घटकांसाठी आर्थिक पाठबळ मिळायला हवे ही शासनाची भुमिका आहे. त्यासाठी मौलाना आजाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येते. त्याद्वारे उच्च शिक्षणासाठी कर्ज दिले जाते. उद्योग व्यवसाय करण्यासाठी मुदत कर्ज योजना आहे. तसेच महिलांच्या कर्तृत्वाला वाव मिळावा यासाठी सुक्ष्म पतपुरवठा योजना  राबविण्यात येते. अशा सर्व घटकांसाठी अर्थसहाय्य योजना राबवून सर्व घटकांचा विकास करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे,असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, महामंडळाकडून दिली जाणारी  कर्ज हमीची रक्कमही ३० कोटी रुपयांवरुन ५०० कोटींवर नेण्यात आली आहे. कर्ज मर्यादाही वाढविण्यात आल्या आहेत.  अल्पसंख्याक समाजाने आधुनिक शिक्षण घ्यावे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना सहकार्य करावे,असे आवाहनही श्री. सत्तार यांनी केले. श्री. सत्तार म्हणाले की,  सिल्लोड येथे अशाप्रकारची राज्यातली पहिली कार्यशाळा असून यानंतर आता विभागनिहाय कार्यशाळा आयोजित करुन राज्यभरात ही योजना पोहोचविली जाईल.

प्रधान सचिव श्रीमती आय.ए. कुंदन म्हणाल्या की, अल्पसंख्याक विकास विभागाची अर्थसंकल्पिय तरतूद २००० कोटींपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच केंद्राकडे द्यावयाची कर्ज हमीही ५०० कोटींपर्यंत वाढविण्यात आली. या तरतुदींमुळे अल्पसंख्याक समाजासाठी अधिकाधिक उपयुक्त योजना राबविणे शक्य होणार आहे. अल्पसंख्याक समाजातील महिलांनी या विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यशाळेचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला. प्रास्ताविक प्रबंध निदेशक लालमिया शेख यांनी केले तर उपसचिव मोईन ताशिलदार यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनीही कार्यशाळेस मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत विविध स्टॉल्स लावून महामंडळाच्या वतीने लाभार्थ्यांची नोंदणी व त्यांना योजनांची माहिती देणे, योजनांचा लाभ देणे ही प्रक्रिया राबविण्यात येत होती. कार्यशाळेस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.