अजित पवार गटाचे विधीमंडळात २६० पानी तर शरद पवार गटाचे १० पानी उत्तर

आमदार अपात्रता प्रकरणी कोणाला मिळणार दिलासा?

मुंबई : सध्या विधीमंडळात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये पडलेल्या फुटीबद्दल सुनावणी सुरु आहे. राष्ट्रवादीच्या निर्णयासाठी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना ३१ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे, तर शिवसेनेबद्दलच्या निर्णयासाठी ३१ डिसेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. दरम्यान, आमदार अपात्रता प्रकरणी अजित पवार गटाच्या वतीने विधिमंडळात २६० पानी उत्तर सादर करण्यात आले आहे. विधीमंडळात सादर केलेल्या उत्तरात राष्ट्रवादी मूळ आमचीच असा दावा अजित पवार गटाने केला आहे.

सरकारला साथ दिलेल्या आमदारांच्या अपात्रतेच्या पुढील सुनावणीसाठी विधीमंडळाने दीड-ते दोन महिन्यापूर्वी शरद पवार आणि अजित पवार गटातील आमदारांना नोटीस बजावली. शरद पवार गटाच्या आमदारांनी नोटीसीला १० पानी उत्तर दिले आहे. तर अजित पवार गटाकडून २६० पानी उत्तर आलं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह चिन्हावर दावा ठोकला होता. राष्ट्रवादी आमदारांचं बहुमत आमच्याकडे असल्यामुळे आमचाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावाही केला होता. राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील देखील आमच्यासोबत असल्यामुळे मूळ राष्ट्रवादी आमचीच आहे. त्यामुळे संख्याबळाच्या बाबतीत निर्णय घेतला जावा. अध्यक्ष यांनी तात्काळ निर्णय घ्यावा अशी भूमिका अजित पवार गटाने घेतली आहे. त्यामुळे कोणत्या गटाला दिलासा मिळतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.