केंद्रीय मंत्र्यावर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली; काय म्हणाले?

मुंबई ,८ जानेवारी  / प्रतिनिधी :- अनेकदा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे टीका करताना अपशब्द वापरल्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्र्यावर टीका करताना अपशब्द वापरला आणि भाजपच्या निशाण्यावर आले. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा एका व्हिडीओ शेअर केला. यामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करताना दिसतात. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “आम्ही अनेकदा या मुद्द्यावर लढत आलो आहोत. मात्र, जे सरकारमध्ये फेविकॉल लावून बसले आहेत, ते सगळे या विषयावर का बोलत नाहीत? एखद्या तरी केंद्रीय मंत्र्याने या विषयावर राजीनामा देऊन महाराष्ट्रात यावे. जो हा अपमान सहन करत आहे, तो **ची अवलाद आहेत.” अशा भाषेत टीका केली.

पुढे ते म्हणाले की, “मी असे मानतो की देशात संविधान न्याय आणि कायदा जिवंत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या राजकीय दबावापोटी महाराष्ट्रात बेकायदेशीर सरकार घडवले आहे, हा डाव नक्कीच उधळला जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली घटना आणि न्यायव्यवस्था जिवंत आहे, याच्यावर देशातील जनतेचा विश्वास बसेल. शिवसेनाही एकच असून ती संघटितच आहे. ६० वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेल्या शिवसेनेबरोबर आम्ही सोबत आहोत. २० ते २५ लोकं आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले असून ते गेल्याने पक्षात फूट पडेल असे होत नाही. ते पुन्हा निवडून येणार नसून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे,”अशी टीका त्यांनी केली.