संवैधानिक नैतिकता जपल्याशिवाय लोकशाही जिवंत राहणे अशक्य – डॉ. अशोक चौसाळकर

छत्रपती संभाजीनगर,१८ मार्च  / प्रतिनिधी :-  लोकसभेचा उद्देश हा लोकांच्या कल्याणाचा विचार करत कायदे करणे हा आहे. लोकशाहीच्या मार्गाने विकास घडवून आणण्यासाठी आपण संसदीय लोकशाहीचा मार्ग स्वीकार केलेला असला तरी आज संसदीय लोकशाहीच्या बदलत्या स्वरूपामुळे स्वातंत्र्यानंतर दशक निहाय चळवळी या बहुतांश पणाने जात धर्म वर्ग या स्तरावर उभ्या राहिल्या, त्यामुळे जातीय व धर्मीय अस्मितेच्या नावाने पुढे जाणारे राजकारण हे आधुनिक, विवेकी होण्यापेक्षा अंधश्रद्धा व बुवाबाजीच्या दिशेने जात असल्याचे वास्तव आहे. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी आज आपल्याला संवैधानिक नैतिकता जपल्याशिवाय लोकशाही जिवंत राहणे अशक्य असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. अशोक चौसाळकर यांनी केले. ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित मोईन शाकीर  स्मृती व्याख्यानमालेच्या विशेष व्याख्यानामध्ये बोलत होते.यावेळी कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून मानवी विद्या शाखेचे अधिष्ठाता,  व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.प्रशांत अमृतकर सर, विभाग प्रमुख डॉ शुजा शाकीर तर   विभागाच्या पहिल्या बॅचमधील
प्रा. बेन्नुर, प्रा. संजय गायकवाड हेआवर्जून उपस्थित होते. मोईन शाकीर स्मृती व्याख्यानमाले बद्दल विभागातील संशोधक विद्यार्थी. रवी काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सत्यपाल कांबळे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय डॉ.सविता नागे यांनी करून दिला. यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करत असताना प्राचार्य देविदास मुळे यांनी बदलत्या परिस्थितीमध्ये ख-या जागृतीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले आणि आज आपल्याला त्या प्रश्नांवरती पर्याय काढत भिडण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.
 यावेळी विविध ज्ञान शाखेतील प्राध्यापक,  विद्यार्थी,  कार्यकर्ते  अभ्यासक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार विभागातील डॉ.मंजुश्री लांडगे  यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ.सविता नागे डॉ. सत्यपाल कांबळे, डॉ. बाळासाहेब किलचे तसेच नितीन केदारे महेश शिंदे विजय सले यांनी परिश्रम घेतले.