‘नालायक’ शब्दप्रयोग उद्धव ठाकरेंना भोवणार! शिंदे सरकार कारवाई करण्याच्या तयारीत

मुंबई,२८ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-गेली दोन दिवस राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिराऊन घेतला आहे. अनेक ठिकाणी फळबागांचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली आहेत. राज्यभरातून शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात मागणी होत आहे. असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तेलंगणा राज्यात प्रचाराला गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पत्रकार परिषद घेत निशाणा साधला आहे. दरम्यान, यावेळी केलेल्या ‘नालायक’ या शब्दप्रयोगावरुन उद्धव ठाकरे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य कारभार करण्यासाठी लायक नाहीत. असा निशाणा उद्धव ठाकरे यांनी केला होता. स्वत:च्या घरात नुकसान आणि दुसरीकडे जाऊन प्रचारात कसे मिरवतात, असं ते म्हणाले होते. बळीराजा गारपीट, अवकाळीच्या संकटात असताना जो माणूस बेपर्वाईने प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातो. असा माणून राज्याचा कारभार करायला नालायक आहे, अशा माणसाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती.

मुख्यमंत्र्यांबद्दल ‘नालायक’ असा शब्दप्रयोग उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर आता राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तेलंगणामध्ये निवडणूक प्रचारासाठी गेले आहेत. त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली असून त्याची सीडी राज्य सरकारने मागवली आहे. ती पाहून पुढील कारवाईसाठी कायदेशीर मतही घेतले जाणार असल्याचेही शंभुराज देसाई यांनी सांगितले. त्यामुळे नारायण राणे यांच्याप्रमाणे शिंदे सरकार आता उद्धव ठाकरे यांना जेलमध्ये टाकणार का, याची उत्सुकता आहे.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल नालायक असा शब्दप्रयोग केल्यानंतर आता शंभुराज देसाई म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरलाय. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत जे स्टेटमेंट आहे, त्याबाबत मी व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप मागवली आहे. ही सीडी कायदेतज्ञांकडून तपासू आणि पुढील निर्णय घेवू. ते मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांच्याबाबत त्यांनी काय केले होते हे सर्वांनी पाहिले होते. राज्याच्या प्रमुखपदी बसलेल्या मुख्यमंत्र्यांबाबत असा शब्दप्रयोग याआधी त्याच पदावर बसलेल्या व्यक्तीने करणे, ते ज्यावेळी मुख्यमंत्रिपदी होते, त्यावेळी त्यांच्याबाबत ज्यांनी वक्तव्य केलं होतं (नारायण राणे) त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जी भूमिका घेतली, तीच भूमिका आम्हाला घेणं शक्य आहे, आम्ही व्हिडीओ-ऑडिओ क्लिप बघून त्याबाबत जरुर विचार करु.”