राज्यात अवकाळी पावसामुळे अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंचनामे केलेले प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे निर्देश

मुंबई,२८ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी शासनाकडे प्राप्त झाली आहे. राज्यातील अवकाळी पाऊस पडलेल्या तालुक्यातील आजपर्यंत प्राप्त प्राथमिक अंदाजे माहितीनुसार ९९ हजार ३८१ हेक्टर बाधित क्षेत्रातील पंचनामे  प्रचलित कार्यपद्धती प्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व  33 टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

राज्यातील काही जिल्ह्यांत २६ नोव्हेंबर रोजी अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळपिकांच्या बाधित क्षेत्राबाबत आज २८ नोव्हेंबर २०२३ रोजी  कृषी विभागाकडून प्राप्त प्राथमिक अंदाजे माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड हे तालुके बाधित असून यातील ५३ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे, पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई व डहाणू तालुक्यातील ४१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे, नाशिक जिल्ह्यातील कळवण, नांदगाव, नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, चांदवड, येवला तालुक्यातील  ३२ हजार ८३३ हेक्टर क्षेत्रातील कांदा, द्राक्ष, सोयाबीन, मका, गहू, ऊस व फळपिके, धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील ४६ हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई, कापूस, हरभरा, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्राणी तालुक्यातील २ हजार २३९ हेक्टर क्षेत्रातील भात, कापूस, तूर, मिरची, मका, कांदा पिकांचे, जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, धरणगाव, बोदवड, भडगाव तालुक्यातील ५५२ हेक्टर क्षेत्रातील कांदा, हरभरा, गहू, मका, ज्वारी व फळपिकांचे नुकसान झाले.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, पारनेर, राहाता येथील १५ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई, मक्याचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, शिरुर तालुक्यातील ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे, सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील १५ हेक्टर क्षेत्रातील भात पिकाचे नुकसान झाले आहे., छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर, पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री तालुक्यातील ४ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील  केळी, पपई व मका पिकांचे नुकसान झाले आहे,

जालना जिल्ह्यातील बदनापूर, जालना, जाफराबाद तालुक्यातील ५ हजार २७९ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, केळी, कांदा, खरीप ज्वारी, गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळी, बीड तालुक्यातील २१५ हेक्टर क्षेत्रातील कांदा, ज्वारी, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील १०० हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, पूर्णा, पालम मानवत सोनपेठ, सेलू तालुक्यातील १ हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी ज्वारी, कापूस, सीताफळ, पेरू, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे, नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड तालुक्यातील ५० हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले आहे, बुलढाणा जिल्ह्यातील बुलडाणा, नांदुरा, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, संग्रामपूर, मेहकर, जळगाव जामोद, मलकापूर, खामगाव, शेगाव, मोताळा, नांदुरा तालुक्यातील ३३ हजार ९५१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपालाचे नुकसान झाले आहे.

नुकसान झालेले क्षेत्र हे प्राथमिक अंदाजानुसार आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी वेळेत सादर करावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केल्या आहेत.

राज्यात आलेल्या अवकाळीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. जवळपास एक लाख हेक्टरवरील पीकांचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. शेतकऱ्यांची आजची स्थिती पाहता नियम अटी, पंचनामे या प्रशासकीय कामात वेळ न घालवता तातडीने मदत देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान पाहता कोरडवाहू शेतीसाठी एकरी २५ हजार रुपये व बागायती शेतीची नुकसान भरपाई म्हणून एकरी ५० हजार रुपयांची मदत तात्काळ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलं आहे. बळीराजा हा सातत्याने संकटाच्या दुष्टचक्रात भरडला जात आहे. यावर्षी सुरुवातील कमी पावसाचा फटका शेतीला बसला आहे. खरिप पुरता वाया गेला आणि आता रब्बी हंगामानेही घात केला आहे. शेतकऱ्याचे हे वर्षच नुकसानीचं ठरलं आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतातील पिके वाया गेली आहेत. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

अवकाळी आलेल्या वादळी पावसाने कापूस, तूर, सोयाबीन, द्राक्षे, आंबा, डाळिंब, पपई, केळी, ऊस, संत्रा या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. राज्यातील १७ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या वादळी पावसाची झळ बसली आहे. तसंच इतरही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला आहे. विशेषत:विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात या अवकाळी आलेल्या वादळी पावसाचा फटका बसला आहे. तसंच पुणे, नगर आणि नाशिकमध्ये या वादळीपासामुळे फळबागा उद्धवस्थ झाल्या आहेत.

शेतकरी जगला तरच आपण जगू, आपली अन्नधान्याची गरज भागवणारा बळीराजा निसर्गामुळे हतबल झाला आहे. एकीकडे महागाई व दुसरीकडे नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची नितांत गरज आहे. शेतकरी दुष्काळाचा सामना करत असताना आता अवकाळी व गारपिटीने पुरता हतबल झाला आहे. सरकारने शेतकऱ्याला तात्काळ मदत करुन आधार दिला पाहिजे. पिकविमा कंपन्यांकडूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून द्यावी, असं नाना पटोले म्हणाले.