केंद्र शासनाच्या योजना लक्षित लाभार्थ्यापर्यंत पोहोचतील- केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

विकसित भारत संकल्प यात्रा:हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

·        26 जानेवारीपर्यंत अत्याधुनिक एलईडी चित्ररथाद्वारे मोहीम

·        जिल्ह्यातील  871 ग्रामपंचायतींमध्ये शासकीय योजनांचा जागर

छत्रपती संभाजीनगर ,२४ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :-विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लक्षित लोकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भगवत कराड यांनी आज येथे व्यक्त केला.

भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित, वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. या यात्रेंतर्गत जिल्हा परिषद आवारात त्यांच्या हस्ते या चित्ररथांना हिरवी झेंडी दाखवून विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.         

 प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा परिषदचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश रामावत  यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.  

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यासाठी 7 एलईडी व्हॅन आल्या आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी एक व्हॅन असून, त्याद्वारे शासकीय योजनांचे प्रबोधन करेल, योजनांची माहिती देईल. स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पूर्वी लाभ मिळालेले लाभार्थी यांच्या उपस्थितीत या व्हॅनचे स्वागत केले जाईल. या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवली जाईल, वंचित लाभार्थींची नोंदणी केली जाईल व योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थींपर्यंत पोहोचवला जाईल. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रत्येक व्हॅन दर दिवशी दोन ग्रामपंचायतींमध्ये फिरणार आहे. या पद्धतीने 26 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील 871 ग्रामपंचायतींमध्ये या व्हॅन फिरणार आहेत. ग्रामीण,शहरी,नगरपालिका स्तरावर लाभार्थी शोधणे, प्रत्येक गरजू लाभार्थीपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि लाभार्थीस त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे या यात्रेचा हेतू आहे.  सदर शासकीय योजनांची माहिती घेऊन  वंचित लाभार्थींनी नोंदणी करावी, जेणेकरून त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येईल, असे ते म्हणाले.

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेची माहिती

विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद – वैयक्तिक यशकथा ,अनुभव कथन, सरकारी योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थींची नोंदणी करणे, ही या विकसित भारत संकल्प यात्रेची उद्दिष्टे  आहेत. गावागावातून शासकीय योजना लाभासाठी  नागरिकांची नोंदणी या अत्याधुनिक चित्ररथच्या माध्यमातून  मिळणार आहे,याचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री कराड यांनी केले.

फिरत्या एलईडी वाहनांद्वारे प्रसिद्धीचे नियोजन

जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात या मोहिमेच्या माध्यमातून भारत सरकारच्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावा. योजनांची व्यापक स्वरुपात जनजागृती करत जिल्ह्यात ही मोहिम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना भागवत कराड यांनी यावेळी दिल्या.

या मोहिमेत ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विकास मीना आणि शहरी भागासाठी मनपा आयुक्त, जी. श्रीकांत हे नोडल अधिकारी आहेत. तसेच या मोहिमेच्या समितीमध्ये अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी जिल्हाधिकारी, जनार्दन विधाते, अशोक शिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश रामावत यांच्यासह तालुका स्तरावर गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यात्रेचे नियोजन करतील. ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ही विशेष मोहीम शहरी, आणि गावपातळीवर राबविण्यात येणार असून यासाठी रुटमॅप तयार करण्यात आला आहे.  जिल्हा प्रशासकीय यंत्रणेतील सर्व विभागांनी सक्रियपणे सहभागी होऊन आपापल्या विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात. केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवित आहे. त्याची सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी जिल्हा ते गावपातळीवर चित्ररथाद्वारे जिंगल्स, पोस्टर्स, छायाचित्रे, ध्वनी-चित्रफिती, पथनाट्य, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रचार –प्रसिद्धी करण्यात येणार आहे.  ग्रामपंचायत स्तरावर मोहीम यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून, अंगणवाडी सेविका, आशा, ग्रामसेवक, तलाठी यांचाही सहभाग घेण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती भागवत कराड यांनी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून “विकसीत भारत संकल्प यात्रा” होत असून केंद्र सरकार, राज्य सरकार यासाठी प्रयत्नरत आहे. उज्ज्वला सारखी योजना, आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना प्रत्येक गावात पोहोचविली जात आहे.